नवी दिल्ली - शुक्रवार दि. २७ जून २०२५
भारतीय लष्कर आता पारंपरिक युद्धपद्धतींच्या पलीकडे जाऊन हायटेक आणि बुद्धिमान तंत्रज्ञानाच्या दिशेने मोठं पाऊल टाकत आहे. मानवाच्या थेट उपस्थितीशिवाय निर्णय घेणारी, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सुसज्ज मशीन गन आता भारतात प्रत्यक्ष चाचण्यांसाठी सज्ज झाली आहे.
बेंगळुरूमधील BSS डिफेन्स या खासगी क्षेत्रातील संरक्षण कंपनीने विकसित केलेली ही अत्याधुनिक नेगेव LMG (लाइट मशीन गन) 7.62x51 मिमीच्या बॅरलसह सुसज्ज आहे. या हत्याराची चाचणी 1 ते 8 जून 2025 दरम्यान, पूर्व हिमालयातील तब्बल 14,500 फूट उंचीवर यशस्वीरित्या पार पडली. चाचणीदरम्यान गनने दाखवलेले अचूकता आणि तंत्रज्ञानाचे कौशल्य लक्षणीय ठरले.
काय आहे या AI मशीन गनचं वैशिष्ट्य?
ही गन एकदा योग्य ठिकाणी तैनात केली की, 21 दिवस सलग कार्य करू शकते — तेही मानवी हस्तक्षेपाशिवाय! रिमोट कंट्रोलशिवायही ही यंत्रणा स्वतः निर्णय घेते आणि "मित्र" व "शत्रू" यातला फरक ओळखून क्षणात गोळीबार करते.
विशेष म्हणजे, ही गन 300 मीटर अंतरावरील लक्ष्य ट्रॅक करू शकते आणि 600 मीटरपर्यंत अचूक फायरिंग करते. तिची कमाल रेंज 1 किलोमीटरपर्यंत आहे. हिमवृष्टी, अंधार, धुके अशा प्रतिकूल हवामानातसुद्धा ती सक्षमतेने कार्य करते. यामागे 'मल्टी-स्पेक्ट्रल सेन्सर फ्यूजन' – थर्मल व ऑप्टिकल सेन्सर यांचं संयोजन आहे, जे कोणतीही हालचाल, सावली किंवा संशयास्पद हालचाली क्षणार्धात टिपतं.
चाचणीदरम्यान, गनने हलत्या सावल्यांचा मागोवा घेतला आणि स्वयंचलित ‘ड्राय रन फायरिंग’ यशस्वीपणे पूर्ण केलं – हे सर्व ऑपरेटरशिवाय!
भारतीय लष्करासाठी नवा टप्पा
नेगेव LMG ही मूळतः इस्रायली बनावटीची असली तरी भारतात तिचं ‘AI अपग्रेड’ केलं गेलं आहे. युद्धाच्या वेळी सैनिकांचा जीव धोक्यात न घालता, तंत्रज्ञानाच्या मदतीने आक्रमक निर्णय घेण्याची ही क्षमता भारतीय लष्कराच्या नव्या युगाची नांदी ठरू शकते.
या गनचं लष्करात लवकरच समावेश होण्याची शक्यता असून, सीमाभागात होणाऱ्या घुसखोरीच्या घटनांवर ती निर्णायक आघात करू शकते. ही यंत्रणा केवळ शत्रूला रोखत नाही, तर भारतीय लष्कराच्या आत्मनिर्भरतेचं आणि तंत्रज्ञानाधिष्ठित भविष्याकडील प्रवासाचं प्रतीक ठरते.