yuva MAharashtra आता ‘ठाकरे विरुद्ध ठाकरे’ नाही, तर ‘ठाकरे अधिक ठाकरे’ : एक नवा अध्याय

आता ‘ठाकरे विरुद्ध ठाकरे’ नाही, तर ‘ठाकरे अधिक ठाकरे’ : एक नवा अध्याय

हिंदी सक्तीविरोधात ५ जुलैला मुंबईत मराठी अस्मितेचा महाजागर
| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - शुक्रवार दि. २७ जून २०२५

महाराष्ट्राच्या राजकीय पटावर एक ऐतिहासिक घडामोड घडत असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येण्याचा निर्णायक टप्पा गाठला आहे. केंद्र सरकारच्या हिंदी सक्तीच्या धोरणाविरोधात हे दोन प्रभावशाली नेते एकत्र व्यासपीठावर उभे राहत असून, ५ जुलै २०२५ रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या घोषणेनं राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली असून, मराठी अस्मितेच्या ज्वाळा पुन्हा धगधगू लागल्या आहेत.

एका आवाजात ‘जय महाराष्ट्र’!

राजकारणातील कटुता विसरून ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार ही बाबच आपल्या आपल्यात ऐतिहासिक ठरते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर या ऐक्याचा फोटो शेअर करत लिहिलं, “मराठी भाषेसाठी आता एकत्र आवाज — एकच मोर्चा, एकच लढा!” या संदेशाने सोशल मीडियावर खळबळ माजवली असून, मराठी जनतेच्या मनात आशेची नवी पालवी फुटली आहे.

मोर्चा केवळ विरोधाचा नाही, तर अस्मितेचा अभिमान

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या आंदोलनाचं स्वागत करत स्पष्ट केलं की, "हा लढा केवळ भाषेविषयक नाही; तो मराठी मनाच्या अस्तित्वाचा आहे. हा मोर्चा मराठी स्वाभिमानाची साक्ष देणारा ठरेल." तर राज ठाकरे यांनी ठाम शब्दांत सांगितलं, "हे केवळ एकत्र येणं नाही, ही मराठी आत्म्याची पुकार आहे."
केंद्राच्या प्रस्तावाविरोधात एकत्र झंझावात

गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकारकडून हिंदी भाषा शालेय अभ्यासक्रमात सक्तीने राबवण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. मात्र याला महाराष्ट्रात तीव्र विरोध होत असून, स्थानिक भाषेवर गदा आणणाऱ्या अशा निर्णयांना मराठी जनतेचा स्पष्ट नकार आहे. ठाकरे बंधूंचा मोर्चा याच पार्श्वभूमीवर उभा राहत आहे.

संयम, शिस्त आणि शक्ती यांचा संगम

५ जुलैच्या मोर्चासाठी तयारी जोमात सुरू असून, दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरायला सज्ज झाले आहेत. आयोजकांनी शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. संजय राऊत यांनी सांगितलं की, “हा मोर्चा मराठी एकतेचं प्रतीक ठरेल. संख्येच्या दृष्टीने आणि भावनेच्या गजरात तो ऐतिहासिक ठरणार आहे.”