| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शनिवार दि. २८ जून २०२५
सांगली शहरातील उर्मिलानगर परिसरात एका २० वर्षीय युवकावर गुन्हेगारी टोळीच्या सदस्यांनी धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, पूर्वी दाखल केलेल्या तक्रारीचा राग मनात धरून आरोपींनी ही थरकाप उडवणारी कृती केली.
आफ्रिद सिकंदर आनंदपुरे (रा. कुपवाड) हा तरुण रामजानकी मंदिराजवळून जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन इसमांनी त्याला अडवले. त्यावेळी एकाने ‘माझ्याविरोधात तक्रार का केलीस?’ असा जाब विचारत धमकी दिली आणि लगेचच कोयत्याने हातावर वार केला. दुसऱ्या व्यक्तीने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले.
यानंतर आफ्रिद याला उर्मिलानगर परिसरात नेण्यात आले, जिथे आणखी एक महिला सहभागी झाली. तिने तक्रार मागे घेण्याची सक्ती केली आणि उर्वरित दोघांना चिथावणी देत पुन्हा एकदा मारहाण सुरू झाली. केवळ एवढ्यावरच न थांबता, पीडिताच्या खिशातील दोन हजार रुपये हिसकावून घेण्यात आले आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून संजयनगर पोलिसांनी तीन जणांविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. विशेष म्हणजे, या तिघांविरोधात यापूर्वीही विविध गुन्ह्यांची नोंद आहे.