yuva MAharashtra सिव्हिल चौकात एसटीची युवकास धडक – दोन दिवसांत दुसरा अपघात, दुचाकीस्वार जखमी

सिव्हिल चौकात एसटीची युवकास धडक – दोन दिवसांत दुसरा अपघात, दुचाकीस्वार जखमी

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शनिवार दि. २८ जून २०२५

सांगलीच्या सिव्हिल चौकात एकाच रस्त्यावर दोन दिवसांत एसटीच्या धडकेत दुसरा अपघात घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास भरधाव एसटी बसने दुचाकीस्वार युवकाला उडवल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुण वैभव गुरूदत्त कोळी (वय २१, रा. हनुमान कॉलनी, सांगली) याच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताच्या वेळी कोळी हा राममंदिर चौकातून सिव्हिल हॉस्पिटलकडे दुचाकीवरून जात होता. याच वेळी कोल्हापूरहून माजलगावकडे निघालेली एसटी (एमएच २० बीएट २७४०) प्रचंड वेगात बसस्थानकातून बाहेर पडलेली एस टी सिव्हिल चौकात आल्यानंतर थेट दुचाकीला धडक दिली आणि कोळी काही अंतर फरफटत गेला.

घटनेनंतर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली. अपघाताचे भयावह दृश्य पाहून अनेकजण हादरले. विश्रामबाग पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, उशीरापर्यंत पोलिस नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती.

विशेष म्हणजे, याच रस्त्यावर कालच एका तरुणीचा एसटीच्या धडकेत मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याची केवळ औपचारिकता पार पाडली, पण वाहतूक व्यवस्थेचा गोंधळ आणि धोकादायक वेगाने धावणाऱ्या वाहनांवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आलं, हे या दुसऱ्या अपघाताने स्पष्ट झालं आहे.