yuva MAharashtra ई-चलन संदर्भातील अडचणी दूर होणार; परिवहन विभागाला समिती गठित करण्याचे आदेश

ई-चलन संदर्भातील अडचणी दूर होणार; परिवहन विभागाला समिती गठित करण्याचे आदेश


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - शनिवार दि. २८ जून २०२५

राज्यातील व्यावसायिक वाहनचालक व मालकांना ई-चलन प्रक्रियेत येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्त करण्यासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठोस पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी वाहतूक संघटनांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत, परिवहन विभागाला तज्ज्ञ व प्रतिनिधींना सामावून घेत समिती स्थापन करण्यास सांगितले असून, या समितीने एका महिन्यात अहवाल सादर करायचा आहे.

या मुद्द्यावर आयोजित बैठकीत मंत्री सरनाईक यांच्यासह अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

बैठकीत ई-चलन प्रणालीत सुधारणा करताना चालक व मालकांना न्याय मिळावा यावर भर देण्यात आला. एकाच कारणावर अनेक वेळा दंड आकारण्यास विरोध करत, एका विशिष्ट कालावधीसाठी चलन ग्राह्य धरावे, असेही सुचविण्यात आले. त्याचप्रमाणे व्यावसायिक वाहनांसाठी योग्य पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

पोलिस कारवाई संदर्भातही महत्त्वाचे बदल सुचवण्यात आले. चलन देताना प्रत्यक्ष घटनास्थळाचे 'रिअल टाइम' फोटो अपलोड करणं बंधनकारक करावं, अनावश्यक दंडात्मक कारवाई टाळावी, व कायद्याची अंमलबजावणी करताना पारदर्शकता आणि न्यायाभिमुखता राखावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.

हा निर्णय केवळ प्रणालीत सुधारणा करण्यापुरता मर्यादित नसून, वाहतूक व्यवस्थेतील विश्वासार्हता आणि व्यावसायिकांचे हित जपण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.