yuva MAharashtra शाळांमध्ये मोबाईल वापरावर बंदीची गरज, आमदार सुमित वानखेडे विधानसभेत करणार मागणी

शाळांमध्ये मोबाईल वापरावर बंदीची गरज, आमदार सुमित वानखेडे विधानसभेत करणार मागणी


| सांगली समाचार वृत्त |
अमरावती - शुक्रवार दि. २० जून २०२५

देशाच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी शिक्षणातूनच होते. मात्र, विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेला मोबाईलचा अतिरेकी वापर त्यांचं शैक्षणिक, मानसिक आणि शारीरिक आरोग्य धोक्यात आणतो आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन, महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापरावर बंदी घालावी, अशी मागणी आर्वी मतदारसंघाचे आमदार सुमित वानखेडे लवकरच पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून करणार आहेत. यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहारही केला आहे.

अमरावती जिल्ह्यातील शिक्षक सुधीर पंजाबराव केने यांच्या पाच वर्षांच्या अभ्यासावर आधारित आहे. केने सरांनी चांदूर रेल्वे तालुक्यातील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या वर्तनावर सखोल निरीक्षण करून, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ – बालरोग, मानसोपचार, नेत्र, मेंदू विकार व अस्थी रोग – यांच्याशी चर्चा केली. या अभ्यासातून पुढे आले की, मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांमध्ये विसरभोळेपणा, चिडचिड, डोळ्यांचे त्रास, मानेच्या वेदना, चक्कर येणे तसेच दीर्घकालीन आजारांचा धोका वाढत आहे. सोशल मीडिया आणि मोबाईल गेम्सच्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये हिंसक वर्तन वाढल्याचंही निदर्शनास आलं आहे. अलीकडेच अमरावतीत एका विद्यार्थ्याच्या दप्तरातून बंदूक सापडल्याची घटना हा धोकादायक कल दर्शवते. ऑस्ट्रेलियासारख्या प्रगत देशांनी देखील सोशल मीडियावर विद्यार्थ्यांना बंदी घालण्याचा कायदा संसदेत मंजूर केला आहे. बोहरा समाजातही मोबाईलवर बंदी घालण्यात आली आहे.


सुधीर केने सरांनी आपल्या शाळेतील इयत्ता ५वी ते १२वीतील विद्यार्थ्यांवर मोबाईल बंदी लागू केली आणि त्याचा थेट सकारात्मक परिणाम दिसून आला. विद्यार्थ्यांमधील आळस कमी होऊन अभ्यासात लक्ष केंद्रीत झाले, गुणवत्तेत लक्षणीय वाढ झाली. त्यांच्या या अभिनव उपक्रमाची राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांनी दखल घेत सन्मान केला आहे.

याच संशोधनाच्या आधारावर आमदार सुमित वानखेडे पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करणार असून, राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोबाईल वापरावर बंदी घालण्याची मागणी करणार आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य, अभ्यासातील गुणवत्ता आणि भावी पिढीचं सुरक्षित भविष्य हेच या मागणीचे मुख्य उद्दिष्ट आहे.