yuva MAharashtra घरेलू महिला कामगार आरोग्य शिबीरातील ७१९ महिलांवर मोफत उपचार करावेत - जिल्हाधिकारी

घरेलू महिला कामगार आरोग्य शिबीरातील ७१९ महिलांवर मोफत उपचार करावेत - जिल्हाधिकारी


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शनिवार दि. १४ जून २०२५

जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या घरेलू कामगार आरोग्य तपासणी अभियानात ७१९ महिला कामगारांमध्ये विविध आजारांचे निदान झाले असून, त्यांना पुढील उपचारांसाठी जिल्ह्यातील विविध सरकारी व धर्मादाय रुग्णालयांमध्ये पाठविण्यात आले आहे. या महिलांवर आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे विनामूल्य व्हावेत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या अभियानाच्या आढावा बैठकीत काकडे बोलत होते. १४ मे रोजी राबवण्यात आलेल्या या विशेष तपासणी उपक्रमात २,५०० हून अधिक महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यातील ७१९ महिलांमध्ये विविध प्रकारच्या आरोग्य समस्या आढळल्या असून, त्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि धर्मादाय संस्थांतर्गत रुग्णालयांमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.



जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले, "घरेलू महिला कामगार समाजाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहेत. त्यांचे आरोग्य दृष्टीआड होता कामा नये. त्यांना योग्य उपचार देऊन आजारमुक्त करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे."

तसेच, यामध्ये उपचार घेऊन बऱ्या झालेल्या महिलांसाठी २ ऑक्टोबर रोजी “आनंद मेळावा” घेण्यात येणार असून, हा उपक्रम ‘सांगली पॅटर्न’ म्हणून संपूर्ण राज्यात उदाहरण बनावा, अशी अपेक्षा काकडे यांनी व्यक्त केली.


या बैठकीत जिल्हाधिकारी काकडे यांनी अवयवदान जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या QR कोड चा प्रचार रुग्णालयांनी करावा, तसेच वड, पिंपळ व आंबा यांसारख्या पर्यावरणपूरक झाडांचे वृक्षारोपण करावे, असेही आवाहन केले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी यावेळी बोलताना, "घरेलू महिला कामगारांच्या आरोग्य सेवांमध्ये कुठलीही कसूर न ठेवता पूर्ण दक्षतेने उपचार करावेत," असे सांगत सर्व सहभागी रुग्णालयांचे आभार मानले.