yuva MAharashtra खोमेनींच्या घरातच उठाव! पुतण्याचा बंडखोरीचा हुंकार; इराणच्या हुकूमशाहीविरोधात खुले आवाहन

खोमेनींच्या घरातच उठाव! पुतण्याचा बंडखोरीचा हुंकार; इराणच्या हुकूमशाहीविरोधात खुले आवाहन


| सांगली समाचार वृत्त |
तेहरान - गुरुवार दि. १९ जून २०२५

इराण-इस्त्रायल दरम्यान तणाव शिगेला पोहोचले असताना, या संघर्षात अमेरिकाही कधीही उडी घेऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र युद्ध सुरू होण्यापूर्वीच इराणमधील सत्तेच्या गाभ्यात – सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांच्या घरात – मोठा उठाव झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. स्वतः खोमेनी यांचे पुतणे महमूद मोरदखानी यांनी त्यांच्या काकाविरोधात थेट बंड पुकारले आहे.

मोरदखानी यांनी इस्लामिक प्रजासत्ताक व्यवस्थेवर तीव्र टीका करत, "या शासनपद्धतीचा अस्त न झाल्यास पश्चिम आशियात खऱ्या अर्थाने शांतता प्रस्थापित होणार नाही," असे जाहीर विधान केले आहे. इस्रायलसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सध्याच्या इराणी नेतृत्वाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, या हुकूमशाहीला संपवण्याचे आवाहन केले आहे.


मोरदखानी 1986 पासून इराणबाहेर वास्तव्यास आहेत. त्यांनी याआधीही अनेक वेळा खोमेनी यांच्या हुकूमशाही विरोधात भूमिका घेतली आहे. अलीकडेच एका मुलाखतीत बोलताना त्यांनी सांगितले, “हे सरकार जितक्या लवकर कोसळेल, तितके या प्रदेशाच्या भविष्याच्या दृष्टीने चांगले ठरेल. ही व्यवस्था स्वतःमध्ये कोणताही बदल घडवून आणत नसेल, तर ती नष्टच झाली पाहिजे.”

आंतरराष्ट्रीय पातळीवर संघर्ष वाढत असतानाच, इराणमध्येच अंतर्गत बंडखोरीची चिन्हं दिसू लागली आहेत. खामेनी यांचेच नातेवाईक त्यांच्याविरोधात आवाज उठवत असल्याने, सत्तास्थितीत मोठा भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.