yuva MAharashtra शिवसेना (उद्धव) - मनसे युतीचे संकेत; शिंदेंचा राज ठाकरेंना स्नेहभोजन निमंत्रणातून खोडा

शिवसेना (उद्धव) - मनसे युतीचे संकेत; शिंदेंचा राज ठाकरेंना स्नेहभोजन निमंत्रणातून खोडा


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - गुरुवार दि. १९ जून २०२५

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युतीसाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त 'सामना'मधून राज ठाकरे यांना पुन्हा एकदा युतीसाठी आवाहन करण्यात आले. मराठी मतांचे विभाजन रोखून पुन्हा मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्याचा उद्धव ठाकरेंचा स्पष्ट निर्धार आहे.

दरम्यान, या प्रयत्नांना एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून प्रतिस्पर्धी रणनीती आखली जात आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंऐवजी शिंदे गटाशी हातमिळवणी करावी, यासाठी हालचाली सुरू असून, मंत्री उदय सामंत यांच्यावर या मोहिमेची विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याच प्रयत्नांतर्गत राज ठाकरेंना स्नेहभोजनाचे निमंत्रण देऊन युतीच्या चर्चेला गती देण्याचा शिंदेंचा मानस आहे.

शिंदे गटातील काही नेत्यांचा दावा आहे की, त्यांची शिवसेनाच खरी आहे आणि मराठी अस्मिता व हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांच्याशी त्यांचे सुसंगत विचार आहेत. त्यामुळे राज ठाकरे अखेरीस त्यांच्यासोबत युती करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.


या राजकीय समीकरणांमध्ये भाजपची भूमिका देखील महत्त्वाची ठरू शकते. भाजपकडून देखील राज ठाकरे यांना थेट आपल्याकडे खेचण्याऐवजी शिंदे गटाशी युतीसाठी प्रोत्साहन दिले जात असल्याचे बोलले जाते, जेणेकरून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सेनेला टक्कर देता येईल.

एप्रिल महिन्यात राज ठाकरेंच्या निवासस्थानी एकनाथ शिंदे यांनी भेट दिली होती. त्यावेळी उदय सामंत यांचीही उपस्थिती होती. त्या भेटीमुळे शिंदे-मनसे युतीच्या चर्चांना जोर मिळाला होता. मात्र, काही काळानंतर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी मराठी स्वाभिमानाच्या मुद्द्यावर एकत्र येण्याची तयारी दर्शवली आणि शिंदे गटासोबतच्या चर्चांना ब्रेक लागला.

पुन्हा एकदा स्नेहभोजनाच्या निमित्ताने शिंदे गट युतीचा रस्ता खुला करण्याच्या प्रयत्नात असून, या पुढील घडामोडी मुंबईच्या राजकारणाला नवे वळण देऊ शकतात.