| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ जून २०२५
महाराष्ट्र सरकारच्या 'लाडकी बहीण' योजनेत आता पात्रतेच्या कठोर चाळणीतून लाभार्थ्यांची छाननी सुरू झाली आहे. आतापर्यंत तब्बल १९ लाखांपेक्षा जास्त महिलांना अपात्र ठरवण्यात आले असून यामध्ये अनेक अशा महिलांचा समावेश आहे, ज्या पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नव्हत्या.
सध्या राज्य सरकारने लाभार्थ्यांच्या उत्पन्न तपासणीची प्रक्रिया सुरू केली असून, त्यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून आवश्यक माहिती मागवली गेली आहे. यामुळे वर्षिक अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिलांना पुढील टप्प्यात योजनेपासून वंचित ठेवण्यात येणार आहे. परिणामी, आणखी लाखो महिलांना लाभापासून वगळले जाण्याची शक्यता आहे.
श्रीमंत लाभार्थ्यांना बाहेरचा रस्ता
सरकारच्या तपासणीत असेही आढळले की काही महिला सरकारी नोकरी, महामंडळांमध्ये नोकरी किंवा निमसरकारी सेवांमध्ये कार्यरत असूनही योजनेचा लाभ घेत होत्या. अशा लाभार्थ्यांना यादीतून हटवले जात आहे. याशिवाय ज्या महिलांच्या कुटुंबप्रमुखाने आयकर विवरणपत्र दाखल केले आहे आणि त्याचे उत्पन्न अडीच लाखांच्या पुढे आहे, अशा महिलांनाही योजनेबाहेर काढले जाणार आहे.
या महिलांना योजनेतून वगळण्यात आले
राज्य सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार, खालील गटांतील महिलांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवण्यात आले आहे:
- संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी – २.३० लाख
- ६५ वर्षांवरील महिला – १.१० लाख
- चारचाकी वाहनधारक महिला – १.६० लाख
- नमो शेतकरी सन्मान योजनेचे लाभार्थी – ७.७० लाख
- सरकारी कर्मचारी – २,६५२
राजकीय प्रतिक्रिया आणि आक्षेप
सरकारच्या या कारवाईवर विरोधकांकडून टीका होत आहे. खासदार संजय राऊत यांनी यावरून अजित पवारांवर थेट घोटाळ्याचा आरोप केला असून, जनतेच्या पैशांचा वापर चुकीच्या पद्धतीने झाल्याचे त्यांनी म्हटले. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीदेखील सरकारच्या भूमिकेवर ताशेरे ओढले, आणि योजनेत कपात करणे म्हणजे सरकारने स्वतःच स्वतःसाठी अडचण निर्माण केली आहे, असे मत व्यक्त केले.
महायुतीत नाराजीचे वातावरण
लाडकी बहीण योजनेच्या खर्चावरून महायुतीतील पक्षांमध्ये मतभेद उफाळून आले आहेत. योजनेचा वाढता आर्थिक भार आणि निधीच्या मर्यादा लक्षात घेता सरकार आता स्पष्टपणे कडक निर्णयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांना पुढील हप्त्याचा लाभ मिळेल की नाही, याबाबत साशंकता वाढली आहे.
📌 लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमचं उत्पन्न, कुटुंबातील नोकरीची स्थिती आणि अन्य योजना लाभ यांची योग्य माहिती तपासूनच अर्ज करावा!