| सांगली समाचार वृत्त |
सांगली - सोमवार दि. ९ जून २०२५
सांगली शहरातील शंभरफुटी रस्त्यावर घडलेल्या एका थरारक घटनेत भाजी विक्रेता महेश प्रकाश कांबळे (वय ४०, रा. यशवंतनगर) याचा निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी मुजाहिद फिरोज शेख (वय २४) आणि त्याचा साथीदार जय सूरज पाटील (वय २१) यांना अटक केली आहे. दोघांवर खून व अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
सूडाची ठिणगी, खुनाची ठरवलेली योजना
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महेश कांबळे याने २०२१ मध्ये फिरोज ऊर्फ बडे शेख याचा खून केला होता. या प्रकरणात त्याला २०२३ मध्ये जामिनावर सुटका मिळाली होती. मात्र या खुनाचा राग फिरोजचा मुलगा मुजाहिद याच्या मनात धगधगत होता. त्यातच महेशचे मुजाहिदच्या नात्यातील महिलेशी असलेले बिनधास्त संबंध त्याच्या रागाला अधिकच चिमटा लावत होते. अखेर या द्वेषातूनच महेशला संपवण्याचा कट रचला गेला.
खुनाची वेळ आणि ठिकाण
५ जून रोजी सकाळी महेश कांबळे हा शंभरफुटी रस्त्यावरील भाजी बाजारात गेला असता, लघुशंकेसाठी थांबलेल्या क्षणी पाठलागावर असलेल्या मुजाहिद व जयने त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. पोटावर आणि डोक्यावर वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली.
तीन दिवसांची चकमकी आणि पोलिसांची शिताफी
खून केल्यानंतर आरोपींनी पोलिसांपासून लपण्यासाठी अनेक ठिकाणी थांबे घेतले. मात्र शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथकांनी त्यांचा मागोवा घेतला. उपनिरीक्षक महादेव पोवार व त्यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे इनाम धामणी परिसरात शनिवारी रात्री सापळा रचण्यात आला. पुलाखाली थांबलेल्या दोघांना पाहताच पोलिसांनी पाठलाग करून पकडले आणि चौकशीअंती खुनाची कबुली घेतली.
तपासाची व्याप्ती वाढणार
पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी सांगितले की, "या प्रकरणातील संशयितांची कसून चौकशी केली जात असून, त्यांना कोणाचा पाठिंबा होता का, त्यांनी पलायनात कुणाची मदत घेतली का, याचा सखोल तपास केला जाईल."
या कारवाईत गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार सतिश लिंबळे, सिकंदर तांबोळी, विनायक शिंदे, रफिक मुलाणी, संतोष गळवे, योगेश सटाले, गणेश कोळेकर, संदीप कोळी, प्रशांत पुजारी, विशाल कोळी व योगेश हाक्के यांच्या पथकांनी सक्रिय सहभाग घेतला.