| सांगली समाचार वृत्त |
सांगली - रविवार दि. ९ जून २०२५
सांगलीतील आदित्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये झालेल्या गोंधळावर संताप व्यक्त करत, संबंधित समाजकंटकांवर त्वरित आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आली आहे. या प्रकरणामागील सूत्रधाराचा शोध घेऊन त्याच्यावरही योग्य ती कारवाई केली जावी, तसेच जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
संघटनेचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची भेट घेऊन निवेदन सुपूर्द केले. यामध्ये डॉ. शरद सावंत यांच्या आदित्य हॉस्पिटलमध्ये झालेल्या तोडफोडीच्या घटनेचा निषेध करण्यात आला आहे.
विश्रामबाग चौकात असलेल्या हॉस्पिटलमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडत रुग्णालयातील काच व वैद्यकीय उपकरणांची तोडफोड केल्याची घटना घडली. या कार्यकर्त्यांनी आरोग्य योजनेअंतर्गत उपचार घेत असलेल्या रुग्णांकडून अतिरिक्त पैसे घेतल्याचा आरोप केला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर माने यांच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये प्रवेश करून घोषणाबाजी केली आणि वातावरण तणावपूर्ण केले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत काही आंदोलकांना ताब्यात घेतले असून, प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर नितीन चौगुले व त्यांच्या सहकाऱ्यांनी डॉ. सावंत यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दर्शवला. यावेळी जिल्हा प्रमुख मोहन शिंदे, शहर प्रमुख संदीप जाधव, आनंदराव चव्हाण, प्रशांत गायकवाड, प्रदीप पाटील, सुरेंद्र इंगळे, आशिष साळुंखे, अजय रेड्डी, सत्यजित संकपाळ व नेताजीराव घाटगे हे उपस्थित होते.