राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. 2011 च्या जनगणनेनुसार ग्रामीण लोकसंख्येच्या आधारे गट व गणांची नव्याने आखणी होणार असून, त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व तहसीलदारांना लोकसंख्येची अद्ययावत माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे येत्या काही दिवसांत प्रशासकीय हालचालींना अधिक वेग येणार असून, गावपातळीवर निवडणुकीच्या रणधुमाळीची चाहूल लागली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुकांना न्यायालयाच्या आदेशानंतर गती मिळालेली आहे. ग्रामविकास विभागाच्या पुढाकाराने घेतलेल्या बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे सदस्यसंख्येचे निर्धारण करण्यासाठी तातडीने लोकसंख्या सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार प्रत्येक तालुक्यात माहिती संकलनाचे काम सुरू झाले आहे.
दरम्यान, काही ग्रामपंचायती शहरी क्षेत्रात समाविष्ट झाल्या असून, काहींचे तालुके किंवा प्रशासकीय स्वरूप बदलले आहे. परिणामी, सद्यस्थितीतील लोकसंख्येचा नव्याने अभ्यास केला जात आहे. जिल्हा परिषद सदस्यांची संख्या किमान ५० आणि कमाल ७५ अशी ठेवण्यात येणार असून, त्यानुसार प्रभाग रचनेस अंतिम रूप दिले जाणार आहे. संबंधित नकाशे आणि तपशील ११ जूनपर्यंत सादर करण्याचे आदेश तहसील कार्यालयांना मिळाले आहेत.
राजकीय हालचालींना गती; इच्छुक मैदानात
निवडणुकीच्या हालचालींना बळ मिळताच इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. काहींनी उघडपणे निवडणूक लढविण्याचा निर्धार करत प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. राजकीय गोटात चाचपणी, बैठका आणि संपर्क मोहिमांना वेग आला आहे. गावागावात राजकीय वातावरण तापू लागले असून, पक्षीय पातळीवर सभा, कार्यक्रम आणि जनसंपर्क वाढवण्यात येत आहे.
गट-गणांच्या नव्या रचनेचा संभ्रम; लवकरच स्पष्टता
2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत ६० गट होते. त्यातील ३७ सर्वसाधारण, १६ ओबीसी आणि ७ अनुसूचित जातींसाठी राखीव होते. त्यानंतर नव्याने गट रचना करण्यात आली होती आणि ६८ गट निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार आरक्षण सोडतही जाहीर झाली होती, पण काही कारणास्तव ती स्थगित झाली. आता पुन्हा नव्याने गट-गण रचना व आरक्षण सोडत होणार असल्याचे संकेत आहेत.
सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, गटांची संख्या ६० राहणार की ६८, आणि गणांची संख्या १२० की १३६, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, पुढील १५-२० दिवसांत हा संभ्रम दूर होऊन निश्चित चित्र समोर येण्याची शक्यता आहे.