yuva MAharashtra स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, ऑक्टोबरमध्ये तीन टप्प्यांत मतदान

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, ऑक्टोबरमध्ये तीन टप्प्यांत मतदान


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - रविवार दि. ८ जून २०२५ 

सर्वोच्च न्यायालयाने ६ मे २०२५ रोजी दिलेल्या आदेशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हालचालींना गती मिळाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने चार महिन्यांत निवडणुका घेण्याच्या उद्दिष्टासह नियोजन सुरू केले असून, त्या तीन टप्प्यांत पार पडणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.

येत्या ऑक्टोबर महिन्यात राज्यातील २९ महापालिका, २५७ नगरपालिका, २६ जिल्हा परिषद आणि २८८ पंचायत समित्यांसाठी मतदान होणार आहे. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे तीन ते साडेतीन महिन्यांचा अवधी लागणार असल्याने, आयोगाने नियोजन सुरू केले आहे.

यासंदर्भात महापालिका, जिल्हा परिषद यांना जून अखेरपर्यंत प्रभाग, गण व गट रचना पूर्ण करण्याचे आदेश पत्राद्वारे दिले आहेत. २०११ च्या जनगणनेच्या आधारे नव्याने प्रभाग रचना केली जाणार असून, काही भागांतील वॉर्ड हद्दीत बदल अपेक्षित आहेत.


निवडणुकीसाठी लागणाऱ्या साधनसामुग्रीबाबत बोलताना वाघमारे म्हणाले की, सुमारे १.५ लाख ईव्हीएम मशीनची आवश्यकता असून, सध्या आयोगाकडे ६५ हजार मशीन उपलब्ध आहेत. त्यामुळे निवडणुका तीन टप्प्यांत घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

प्रथम टप्प्यात उत्तर व दक्षिण महाराष्ट्रातील मतदान पार पडेल, दुसऱ्या टप्प्यात विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा तर शेवटच्या टप्प्यात मुंबई, ठाणे आणि कोकण परिसरात मतदान होईल.

पावसाळ्याचा विचार करुन मतदानाच्या तारखा ठरवण्यात येणार असून, हवामान खात्याच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही वाघमारे यांनी स्पष्ट केले.