| सांगली समाचार वृत्त |
तेहरान - रविवार दि. २२ जून २०२५
मध्यपूर्वेत सध्या इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण क्षेत्रात तणावाचा भडका उडालेला आहे. इस्रायलने इराणच्या अनेक संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले चढवले असून, त्यामुळे इराणला मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आता इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनेई स्वत: इस्रायलच्या रडारवर असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
युद्धजन्य परिस्थिती आणि वाढत्या आरोग्यविषयक चिंता लक्षात घेता ८६ वर्षीय खामेनेई यांनी त्यांच्या पश्चात इराणच्या सर्वोच्च नेतेपदासाठी कोणती नेतेमंडळी योग्य ठरतील, याचा विचारपूर्वक निर्णय घेतला आहे. त्यांनी तिघा शिया धर्मगुरूंची नावं पुढे करत भावी नेतृत्वाची दिशा ठरवण्याची तयारी दाखवली आहे. विशेष म्हणजे, या नावांमध्ये त्यांच्या मुलाचा समावेश नाही.
इराणचा निर्णायक पवित्रा
गेल्या आठवड्यापासून दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या या संघर्षात दोन्ही बाजूंना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे इराणच्या संरक्षण आणि दळणवळण यंत्रणेला मोठा फटका बसला असला, तरी इराणही प्रत्युत्तरादाखल आक्रमक कारवाई करत आहे. अमेरिकेकडून येणाऱ्या दबावाची पर्वा न करता इराण आपली लढाई अधिक तीव्र करत आहे.
खामेनेई यांनी केवळ उत्तराधिकारींची नावे जाहीर केली नाहीत, तर सैन्य व्यवस्थेमध्येही काही नव्या नियुक्त्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता इराण निर्णायक टप्प्यावर उभा असल्याचे संकेत मिळत आहेत.
जागतिक स्तरावर इराणला पाठिंबा
या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चीनने इस्रायलच्या युद्धात्मक भूमिकेचा निषेध करत इराणला थेट पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही समीकरणं झपाट्याने बदलताना दिसत आहेत.