| सांगली समाचार वृत्त |
सांगली - रविवार दि. २२ जून २०२५
राज्यातील वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या असून, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (NMC) नुकत्याच केलेल्या पाहणी अहवालात महाराष्ट्रातील ३० वैद्यकीय महाविद्यालयांनी निर्धारित निकष पूर्ण न केल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचाही समावेश आहे.
एनएमसीच्या पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण मंडळाने (UGMEB) नव्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विविध महाविद्यालयांची तपासणी केली. या तपासणीत प्राध्यापक संख्येपासून ते वैद्यकीय व शैक्षणिक पायाभूत सुविधा पुरेशा नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे मिरजसह इतर काही शासकीय महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांत मिरज महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या वाढवून ती २०० पर्यंत नेण्यात आली असली तरी शिक्षक व प्राध्यापकांच्या नियुक्तीच्या बाबतीत मोठी तफावत आहे. आवश्यक असलेल्या १५३ प्राध्यापकांपैकी केवळ १४० पदे कार्यरत आहेत, तर एकूण २३ टक्के पदे रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय, हॉस्पिटलमध्ये ५०० खाटा, २७० निवासी डॉक्टर व ४१५ परिचारिका कार्यरत असूनही, शैक्षणिक दर्जा टिकवण्यासाठी आवश्यक साधनसंपत्ती व सुविधा अपुऱ्या असल्याची तक्रार आहे.
फक्त मिरजच नव्हे, तर मुंबई, अंबरनाथ, अमरावती, हिंगोली, वाशिम, गडचिरोली, जालना, बुलढाणा आणि भंडारा येथील नव्याने स्थापन करण्यात आलेल्या १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्येही अशीच स्थिती आहे. त्यामुळे एनएमसीने राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडे याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.