फोटो सौजन्य : दै. ललकार
| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शनिवार दि. २८ जून २०२५
सांगली जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेची धुरा लवकरच एका अनुभवी महिला पोलिस अधिकाऱ्याकडे जाणार आहे. कल्पना बारवकर यांची अप्पर पोलिस अधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्या लवकरच पदभार स्वीकारणार आहेत. राज्य गृह विभागाने याबाबतचे आदेश नुकतेच निर्गमित केले आहेत.
सध्या अमरावती शहरात उपायुक्त पदावर कार्यरत असलेल्या बारवकर यांचा पोलिस सेवेतला प्रवास २००७ साली अकोला येथून सुरू झाला. त्यानंतर बुलढाणा, औरंगाबादसह विविध ठिकाणी त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. २०१५ मध्ये त्यांना भंडारा जिल्ह्याच्या अप्पर अधिक्षकपदी पदोन्नती मिळाली. पुणे पोलिस आयुक्तालय आणि सीआयडीमधील अनुभवासह, त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात व नांदेड परिक्षेत्रातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दौंड येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यपदाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली आहे.
सांगलीत माजी अप्पर अधिक्षक रितू खोखर यांची धाराशिवला बदली झाल्यानंतर, त्या जागी आता कल्पना बारवकर या अधिकारी पदावर विराजमान होणार आहेत. त्यांचा प्रशासकीय अनुभव आणि नेतृत्वगुण जिल्ह्याच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी उपयुक्त ठरणार आहेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.