| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - शनिवार दि. २८ जून २०२५
विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळवल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील भाजपच्या नेतृत्वबदलाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी नवे नाव निश्चित करणे अनिवार्य झाले आहे. या महत्त्वाच्या जबाबदारीसाठी पक्षनेतृत्वाने दिल्लीतून खास पाऊल उचलत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या निरीक्षणाखाली नवीन प्रदेशाध्यक्षाच्या निवडीचा मार्ग मोकळा होणार आहे.
भाजपमध्ये ‘एक व्यक्ती, एक पद’ या धोरणामुळे बावनकुळे यांच्याकडे असलेलं नेतृत्व दुसऱ्या पात्र उमेदवाराकडे दिलं जाणार आहे. परिणामी, पक्षाच्या गोटात संभाव्य चेहऱ्यांची चर्चा रंगू लागली आहे. स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे नेमणूक महत्त्वाची ठरणार आहे.
पक्षांतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार, प्रदेशाध्यक्षपदासाठी अनुभवी नेत्याला संधी देण्याचा विचार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात बाजूला राहिलेल्या रवींद्र चव्हाण व डॉ. संजय कुटे ही दोन नावं विशेष चर्चेत आहेत. त्यातही रवींद्र चव्हाण यांचा झुकाव अधिक असल्याचं बोललं जातं. फडणवीस यांच्या निकटवर्तीय असलेल्या चव्हाण यांचे कोकणातील काम व पक्ष यशातला वाटा या पदासाठी त्यांना अधिक मजबूत उमेदवार ठरवत आहेत.
राजकीय पारडं मराठा समाजाकडे झुकवण्याचा विचार असेल, तर चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक आहे. दुसरीकडे, पक्ष नवख्या चेहऱ्याला संधी देतो की अनुभवी नेतृत्वावर विश्वास ठेवतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.