yuva MAharashtra रायगड उत्खननात ऐतिहासिक 'यंत्रराज'चा शोध – संभाजीराजेंची माहिती

रायगड उत्खननात ऐतिहासिक 'यंत्रराज'चा शोध – संभाजीराजेंची माहिती


| सांगली समाचार वृत्त |
सातारा - दि. ३ जून २०२५

रायगड किल्ल्यावर भारतीय पुरातत्त्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त संशोधनातून ऐतिहासिक दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण शोध समोर आला आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी यासंदर्भातील माहिती त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. त्यांनी सांगितले की, 'यंत्रराज' म्हणून ओळखले जाणारे एक प्राचीन खगोलशास्त्रीय उपकरण - Astrolabe - रायगडाच्या उत्खननादरम्यान सापडले आहे.

या उपकरणाचा वापर प्राचीन काळी ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास, दिशा ठरवणे आणि वेळेचे मोजमाप करण्यासाठी केला जात असे. 'Astrolabe' हे उपकरण ज्ञान, गणित आणि खगोलशास्त्र यांचा संगम असून, ते 'यंत्रराज' या नावाने अधिक परिचित आहे.

संभाजीराजेंच्या म्हणण्यानुसार, रायगडाच्या निर्मितीत केवळ स्थापत्यशास्त्र नव्हे, तर त्या काळात खगोलशास्त्रीय विचारांचाही प्रभाव होता, याचा हा महत्त्वाचा पुरावा आहे. दुर्गराज रायगडाचे बांधकाम अत्याधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून झाल्याचे संकेत या उपकरणाच्या सापडण्यामुळे मिळतात.


पुन्हा एकदा, रायगड किल्ल्यावर सुरू असलेल्या उत्खननामध्ये कुशावर्त तलाव आणि वाडेश्वर मंदिर परिसरात खगोलशास्त्राशी संबंधित हा Astrolabe सापडल्याचे स्पष्ट झाले आहे. या यंत्रावर कोरलेली अक्षरे आणि मध्यभागी असलेली कासव व सापासारख्या दोन प्राण्यांची चित्रे विशेष लक्षवेधी आहेत. त्यावर "मुख" आणि "पूंछ" अशा दिशादर्शक अक्षरांनी उत्तर-दक्षिण दिशा ठरवण्यास मदत होत असावी, असा तर्क संशोधक मांडत आहेत.

गेल्या तीन-चार वर्षांपासून रायगडाच्या विविध भागांत, जसे की रोपवे अप्पर स्टेशनच्या मागील बाजूस, कुशावर्त तलाव, बाजारपेठ ते जगदीश्वर मंदिर परिसरात शिवकालीन वाड्यांचे अवशेष उजेडात आणण्याचे कार्य सुरू आहे. त्याच उत्खननामधून हे दुर्मीळ आणि मौल्यवान 'यंत्रराज' उघडकीस आले आहे.

हा सापडलेला Astrolabe म्हणजे केवळ एक उपकरण नाही, तर त्या युगातील विज्ञान, खगोलशास्त्र आणि वास्तुकलेचा संगम दर्शवणारा एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. या शोधामुळे इतिहास अभ्यासकांसाठी संशोधनाचे नवे दालन खुले झाले आहे.