| सांगली समाचार वृत्त |
सांगली - मंगळवार दि. २४ जून २०२५
जयश्री पाटील यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश करताच, त्यांच्या निर्णयामागे "अन्यायाची भावना" असल्याचे जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी या मुद्द्यावर उपरोधिक शैलीत जोरदार निशाणा साधला आहे.
ते म्हणाले, "चार वेळा मुख्यमंत्री, केंद्रात मंत्री, आमदार-खासदार आणि सांगली महापालिकेचं नेतृत्व मिळवूनही जर अन्याय होत असेल, तर आम्हालाही तसाच अन्याय अनुभवायला मिळावा. आम्हीही आमदार-खासदार व्हायचं स्वप्न पाहतो!"
जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशावर भाष्य करताना त्यांनी पुढे म्हटले, "या प्रवेशामागचं खरं कारण खुद्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच स्पष्ट केलं आहे – वसंतदादा बँकेच्या आर्थिक जोखडातून मुक्त होण्यासाठीच हा निर्णय घेतल्याचं त्यांनीच सांगितलं आहे. त्यामुळे आता यात अजून बोलण्यासारखं काही उरलेलं नाही."
मात्र, त्यांनी एक गंभीर प्रश्न उपस्थित केला – "स्वतःच्या कर्जमुक्तीसाठी पक्ष बदलायचा, पण ज्यांनी विश्वासाने बँकेत पैसे ठेवले होते, त्यांच्या रकमा अडकलेल्या आहेत – त्या ठेवी कुणी परत करणार?"
"वसंतदादा घराणं उतरलं, तरी जनतेनं नाकारलं!"
जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेस पक्ष कमजोर झाल्याच्या चर्चांवरही त्यांनी खोचक प्रतिक्रीया दिली. "विधानसभा निवडणुकीत वसंतदादा घराणं माझ्याविरोधात रिंगणात उतरलं होतं. तरीसुद्धा जयश्री पाटील यांचे डिपॉझिट जप्त झालं. मग आता त्यांचा भाजप प्रवेश पक्षाला कसा त्रासदायक ठरेल?"
"भाजपची ऑफर नाकारली – काँग्रेसमध्येच राहणार!"
पृथ्वीराज पाटील यांनी भाजपकडून त्यांना आणि खासदार विशाल पाटील यांना पक्षप्रवेशासाठी आलेल्या ऑफर्सबद्दलही खुलासा केला. त्यांनी स्पष्ट केलं की, "राजकारणात पारदर्शकता ठेवल्यामुळे आम्हाला काँग्रेस सोडण्याची गरज भासलेली नाही."
त्यांनी सांगितले की, "जयश्रीताईंच्या जाण्याने पक्षात एक नवी जागा निर्माण झाली आहे. ही संधी नव्या कार्यकर्त्यांसाठी सुवर्णसंधी ठरेल."
"महापालिकेत काँग्रेसचाच झेंडा फडकेल!"
महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत त्यांनी आशावाद व्यक्त केला. "दोन वेळा पराभूत झालो तरी लढणं सोडलं नाही. आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आगामी रणनीती ठरवली जाईल आणि सांगली महापालिकेवर पुन्हा काँग्रेसचाच झेंडा फडकेल!" – असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.