| सांगली समाचार वृत्त |
छ. संभाजीनगर - मंगळवार दि. २४ जून २०२५
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी पंढरपूर वारीसंदर्भात केलेल्या एका वक्तव्यामुळे राज्यभरात चर्चेला आणि संतापाला सुरुवात झाली होती. विविध स्तरांवरून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली गेली होती. अखेर खुद्द आझमी यांनी पुढाकार घेत, आपल्या विधानावर स्पष्टता देत सर्वांची माफी मागितली आहे.
एक्स (माजी ट्विटर) या माध्यमावर त्यांनी यासंदर्भात एक पोस्ट प्रसिद्ध करत म्हटले की, "माझ्या वक्तव्यामुळे जर कोणत्याही वारकरी भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील, तर मी माझे शब्द परत घेतो आणि मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. माझा हेतू कधीही कोणालाही दुखावण्याचा नव्हता."
आझमी यांनी स्पष्ट केलं की, सोलापूरमध्ये दिलेल्या भाषणातील काही भाग चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आला. "माझ्या बोलण्याचा विपर्यास करून ते दुर्भावनापूर्ण स्वरूपात प्रसारित करण्यात आलं, यामुळे गैरसमज पसरले," असे त्यांनी नमूद केले.
आपल्या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी वारी परंपरेबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली. “मी एक समाजवादी विचारसरणीचा माणूस असून, प्रत्येक धर्म, संस्कृती, सूफी परंपरा आणि संतांच्या शिकवणीचा आदर करतो. पंढरपूर वारी ही महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा एक गौरवशाली भाग आहे. या परंपरेचा मला अभिमान आहे आणि वारकरी बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो,” असे भावनिक वक्तव्य त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले.