| सांगली समाचार वृत्त |
मावळ - सोमवार दि. १६ जून २०२५
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी दुपारी घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल अचानक कोसळल्याने मोठा अपघात घडला असून, २० ते २५ जण नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत काही लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
घटना तळेगाव दाभाडे शहराजवळील कुंडमळा परिसरात दुपारी सुमारे ३.३० वाजता घडली. पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी रविवारी सुट्टीमुळे मोठी गर्दी झाली होती. अनेक पर्यटक पुलावर उभे असतानाच पूल कोसळल्याने काही जण थेट नदीत कोसळले. या घटनेत आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती असून मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.
दुर्घटनास्थळी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले असून, एनडीआरएफचे जवान, अग्निशमन दल आणि पोलिसांनी मदतकार्य हाती घेतले आहे. काही पर्यटक अजूनही बेपत्ता असल्याची माहिती आहे. त्यामुळे शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. नागरिकांनी घटनास्थळी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कुंडमळा परिसरातील हा पूल अत्यंत जुना असून त्याची वेळोवेळी देखभाल करण्यात आलेली नव्हती. पावसामुळे नदीला मोठा पूर आला असूनही सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केल्या गेल्या नसल्याने ही दुर्घटना टाळता आली नाही, असा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदीचा प्रवाह प्रचंड वाढला आहे. अशा परिस्थितीत जुनाट पूल वापरणे धोकादायक ठरले असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचे बोलले जात आहे.