| सांगली समाचार वृत्त |
नागपूर - सोमवार दि. १६ जून २०२५
नागपूर : राज्यातील गाजत असलेल्या शिक्षक भरती गैरव्यवहार प्रकरणात नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, भाजपच्या एका स्थानिक नेत्याला अटक करण्यात आली आहे. सायबर विभागाच्या तपासात उघड झालेल्या माहितीवरून, बनावट शालार्थ आयडी तयार करून लाखो रुपयांचा अपहार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
अटक करण्यात आलेल्या नेत्याचे नाव दिलीप धोटे असून, ते विठ्ठल-रुख्मिणी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यावर पाच शिक्षकांचे बनावट शासकीय ओळख क्रमांक (शालार्थ आयडी) तयार करून, मागील दहा वर्षांचे थकीत वेतन (अरियर्स) स्वतःकडे वळवण्याचा आरोप आहे. पोलिसांच्या विशेष तपास पथकाने ही कारवाई केली.
या घोटाळ्याच्या प्राथमिक चौकशीत असेही उघड झाले आहे की, शिक्षक भरतीसाठी उमेदवारांकडून लाखो रुपयांची लाच घेतली गेली होती. दिलीप धोटे यांनीच या पैशांचा स्वीकार केला असल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून वेतन विभागातील अधीक्षक निलेश वाघमारे याचे नाव पुढे आले असून, त्यानेच बनावट आयडी तयार केल्याची कबुली दिली आहे.
दिलीप धोटे हे नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील मोहपा येथील रहिवासी असून, त्यांच्या संस्थेअंतर्गत प्रतिभा उच्च प्राथमिक शाळा आणि धापेवाडा पब्लिक स्कूल या दोन शाळा कार्यरत आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी आठ शिक्षकांची बनावट कागदपत्रे सादर करून त्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या, आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांचे शालार्थ आयडी मंजूर करून घेतले होते. या प्रकरणातच त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अटक केल्यानंतर दिलीप धोटे यांना न्यायालयात हजर करण्यात आले असून, सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
संपूर्ण राज्यात शिक्षक भरती घोटाळ्याची साखळी उघड होत चालली असून, आतापर्यंत या प्रकरणात ९ जणांना अटक झाली आहे. यामध्ये शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांसह, काही दलालांचाही समावेश आहे. चार उपशिक्षण संचालकांवरही कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत २० पेक्षा अधिक आरोपींना अटक झाली असून, पोलिसांचे लक्ष आता विविध शिक्षण संस्थांच्या व्यवस्थापकांकडे वळले आहे. गोंदिया जिल्ह्यातील एका संस्थाचालकाला याआधीच अटक झाली होती.