| सांगली समाचार वृत्त |
अहमदाबाद - सोमवार दि. १६ जून २०२५
१२ जून रोजी अहमदाबाद विमानतळावरून लंडनकडे निघालेल्या एअर इंडिया फ्लाइट AI-171 या बोईंग 787 ड्रीमलाइनर विमानाचा भीषण अपघात झाला. टेकऑफनंतर काही वेळातच हे विमान एका रहिवासी परिसरावर कोसळले आणि या दुर्घटनेत २७० हून अधिक जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेमागील नेमकी चूक काय होती, यावर अनेक तर्कवितर्क लावले जात असताना आता कॅप्टन स्टीव्ह नावाच्या विमानतज्ज्ञाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो आहे. त्यात त्यांनी हा अपघात कॉकपिटमधील मानवी चुकांमुळे झाला असण्याची शक्यता मांडली आहे.
नेमकी चूक काय झाली असावी?
कॅप्टन स्टीव्ह यांच्या म्हणण्यानुसार, टेकऑफदरम्यान सह-वैमानिकाने 'लँडिंग गियर' वर घेण्याऐवजी चुकून 'फ्लॅप्स' मागे घेतले असावेत. त्यामुळे विमान उड्डाणासाठी आवश्यक असलेली "लिफ्ट" अचानक कमी झाली असावी. या एका कृतीने विमानाचा तोल गेला आणि काही क्षणांतच ते कोसळले.
ते पुढे सांगतात की, टेकऑफच्या सुरुवातीस विमानाला खूपच कमी वेग असतो. अशावेळी जर फ्लॅप्स मागे घेतले, तर पंखांची लिफ्ट क्षमता तात्काळ कमी होते. परिणामी, विमान वर जाण्याऐवजी खाली झुकते. व्हिडीओ फुटेजनुसार विमानाचे नाक अवघ्या २.५ अंशांनी वर गेले होते, मात्र नंतर ते टिकू शकले नाही. वैमानिकांनी विमान सावरायचा पुरेपूर प्रयत्न केला, पण उशीर झाल्यामुळे ते शक्य झाले नाही.
फ्लॅप्स म्हणजे काय?
फ्लॅप्स म्हणजे विमानाच्या पंखांवर असलेली हालणारी पाते, जी टेकऑफ किंवा लँडिंगवेळी लिफ्ट वाढवण्यासाठी वापरली जातात. विशेषतः कमी वेगाने उड्डाण करताना यांचा उपयोग फार महत्त्वाचा ठरतो. फ्लॅप्समुळे पंख अधिक लिफ्ट निर्माण करतात आणि विमान अधिक स्थिरतेने वर जाऊ शकते.
इंजिन बिघाड किंवा इतर कारण?
काही सोशल मीडियावरील युजर्सनी अपघातामागे इंजिन निकामी होणे किंवा पक्षी धडक यांसारखे कारण असल्याचा दावा केला होता. मात्र कॅप्टन स्टीव्ह यांनी ही शक्यता नाकारली. व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये दोन्ही इंजिन व्यवस्थित कार्यरत असल्याचे दिसून आले आहे. कुठेही धूर, ठिणग्या किंवा आगीचे कोणतेही चिन्ह नव्हते.
अंतिम निष्कर्ष काय?
कॅप्टन स्टीव्ह यांनी याला "हृदयविद्रावक मानवी चूक" असे संबोधले आहे. अत्यंत अनुभवी वैमानिक असूनही, एका क्षुल्लक चुकीमुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर प्राणहानी झाल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. तरीही, हा फक्त एक संभाव्य तांत्रिक दृष्टिकोन आहे. अपघाताची खरी कारणमीमांसा सध्या विमानाच्या ब्लॅक बॉक्स तपासणीनंतरच स्पष्ट होईल.