| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - सोमवार दि. १६ जून २०२५
NEET UG 2025 परीक्षेतील गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवत पालकांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील दोघांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) ताब्यात घेतले असून, या प्रकरणात सांगलीतील एक संशयित अडकल्याचे समोर आले आहे. मात्र, अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. या घोटाळ्यामुळे 'सांगली कनेक्शन'ची चर्चा राज्यभर रंगत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, CBIने ९ जून रोजी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. तपासात असे उघड झाले की, काही संशयितांनी NEET परीक्षेत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळवून देण्याचे आश्वासन देत पालकांकडून कोट्यवधी रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी सीबीआयने तांत्रिक तपासाला सुरुवात केली असून, दोघा संशयितांवर लक्ष केंद्रित केले.
या टोळीतील एका व्यक्तीने प्रत्येकी विद्यार्थ्यांमागे ९० लाख रुपये मागितल्याची माहिती आहे. निकालाच्या काही तास आधी वाढीव गुण मिळाल्याची माहिती दिली जाईल, असे आमिषही त्याने दिले होते. या घोटाळ्यातील एक आरोपी सांगलीमधील शिक्षण सल्लागार संस्था चालवतो, असे उघड झाले आहे.
CBIच्या पथकाने मुंबईसह सांगलीत छापेमारी करत महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त केले आहेत. आरोपींच्या मोबाईल आणि इतर डिजिटल माध्यमांमधून संभाव्य उमेदवारांची यादी, त्यांच्या प्रवेशपत्रांचे तपशील, ओएमआर शीट्स आणि आर्थिक व्यवहारांचे पुरावे हस्तगत करण्यात आले आहेत.
सध्या CBIकडून आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी केली जात असून, फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांचीही ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक तपासात कोणताही सरकारी अधिकारी किंवा NTAचा कर्मचारी यात सहभागी असल्याचे संकेत मिळालेले नाहीत.