| सांगली समाचार वृत्त |
सांगली - सोमवार दि. १६ जून २०२५
सांगली – सर्वोदय सहकारी साखर कारखाना परत घ्यायचा असेल, तर जयंतराव पाटील यांनी त्यासाठी किती रक्कम लागेल ते स्पष्टपणे सांगावे, मी ती रक्कम देण्यास तयार आहे, असा थेट पवित्रा घेत राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंतरावांना उघड आव्हान दिले आहे. हे आव्हान त्यांनी आज सांगलीच्या मारुती चौकातून दिले.
भाजपच्या सत्ताकाळात झालेल्या विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी सर्वोदय कारखान्याच्या संदर्भात आपली भूमिका मांडली.
चंद्रकांत पाटील म्हणाले, "सर्वोदय कारखान्याचा विषय खूप जुना आहे. २०१४ ते २०१९ दरम्यान भाजप सत्तेत असताना आम्ही कायदेशीर प्रक्रियेनुसार तो प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. सभासदांच्या हक्कात कारखाना परत येत होता, गाळपासाठी परवानाही मिळणार होता. पण दुर्दैवाने महापूर आला आणि सगळं अडकलं. त्यानंतर सत्तांतर झालं आणि जयंतरावांनी आपली राजकीय ताकद वापरून पुन्हा कागदपत्रांमध्ये फेरबदल केले."
"आता आम्ही सत्तेत आहोत. कायद्याच्या चौकटीत राहून योग्य तो निर्णय घेऊ. जयंतरावांनी फक्त इतकं सांगावं की, किती रक्कम लागेल कारखाना परत घेण्यासाठी. आम्ही ती रक्कम देण्यास तयार आहोत," असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी दिवंगत आमदार संभाजी पवार यांना अभिवादन करून त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी पवार यांच्या सुपुत्र पृथ्वीराज पवार यांच्या कार्यालयाला भेट देत, "आता कार्यालयाचं रूप बदलायला हवं," अशी विनोदी टिप्पणीही केली.
यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलं, "पृथ्वीराजच्या पाठीवर विश्वासाचं बळ ठेवा. भारतीय जनता पक्ष त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. माणसाच्या आयुष्यात काय घडेल सांगता येत नाही, पण त्यातच खरी गंमत आहे," असे उद्गार त्यांनी काढले.