yuva MAharashtra राजकोट किल्ल्यातील शिवरायांच्या पुतळ्याजवळ जमीन खचली; गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

राजकोट किल्ल्यातील शिवरायांच्या पुतळ्याजवळ जमीन खचली; गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह


| सांगली समाचार वृत्त |
सिंधुदुर्ग - सोमवार दि. १६ जून २०२५

मालवण येथील ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर नुकत्याच उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याजवळील चबुतऱ्यालगतची जमीन खचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या भागात पडलेल्या मोठ्या भगदाडामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, बांधकामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुतळ्याच्या डाव्या बाजूला चबुतऱ्याच्या शेजारील जमीन खचून त्या ठिकाणी मोठं भगदाड निर्माण झालं आहे. सदर घटना व्हिडीओद्वारे सोशल मीडियावर झपाट्याने पसरली असून, प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र, स्थानिक नागरिक आणि शिवप्रेमी मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करत आहेत.

विशेष म्हणजे, या पुतळ्याचं उद्घाटन काही आठवड्यांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषात झालं होतं. तलवारीसह पुतळ्याची उंची सुमारे ८३ फूट असून, चबुतऱ्याची उंची १० फूट आहे. या भागात काम सुरू असताना, दर्जा तपासण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणांवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.


याआधी, २६ ऑगस्ट २०२४ रोजी याच ठिकाणी उभारलेला ४० फूट उंचीचा पुतळा कोसळल्याची घटना घडली होती. त्यानंतर सरकारवर टीकेची झोड उठली होती. त्याच पार्श्वभूमीवर महायुती सरकारने अधिक भव्य आणि देखणा पुतळा उभारण्याची घोषणा करत काम हाती घेतलं. परंतु, अवघ्या काही महिन्यांतच जमीन खचल्याने पुन्हा एकदा बांधकाम गुणवत्तेवर संशय व्यक्त होतो आहे.

घटनास्थळी पाहणी करण्यात आली असून, पुतळ्याच्या स्थैर्याला सध्या तरी धोका नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येतं आहे. मात्र, सार्वजनिक निधीच्या वापराबाबत पारदर्शकता नसल्यानं नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दोषी ठेकेदारांवर तात्काळ कारवाई करून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.