| सांगली समाचार वृत्त |
सांगली - सोमवार दि. १६ जून २०२५
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या घडामोडी घडताना दिसत आहेत. सोमवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी भाजपचे नेते आणि राज्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देत त्यांच्या प्रवेशावर अंतिम मोहर उमटवली. येत्या दोन दिवसांत मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे.
या भेटीवेळी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, जनसुराज्यचे नेते समित कदम, शेखर इनामदार, सी. बी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीत जयश्रीताईंनी पुढील राजकीय वाटचालीबाबत सविस्तर चर्चा केली. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजप प्रवेश ठरला.
काँग्रेसकडून विधानसभेच्या निवडणुकीत जयश्रीताईंना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यानंतर काँग्रेसकडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. यानंतर त्यांनी स्वतंत्र राजकीय भूमिका घ्यायचे ठरवले. काही दिवसांपूर्वी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. याच दरम्यान त्यांना भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही पक्षप्रवेशासाठी आमंत्रण मिळाले होते. मात्र, त्यांनी भाजपचा स्वीकार करत स्पष्ट भूमिका घेतली आहे.
महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मदनभाऊ गट भाजपसोबत यावा, यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जयश्रीताईंशी सातत्याने संवाद साधला होता. या चर्चेला आज ठोस रूप मिळाले असून, आता जयश्रीताई पाटील यांचा भाजप प्रवेश औपचारिकतेच्या उंबरठ्यावर आहे.