| सांगली समाचार वृत्त |
अमरावती - मंगळवार दि. १७ जून २०२५
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी सात दिवसांचं उपोषण करत सरकारला चांगलंच हादरवून सोडणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांना आता मोठा धक्का बसला आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदावरून त्यांची निवड रद्द करत त्यांना अपात्र घोषित करण्यात आलं आहे.
सदर कारवाई मागील काळातील एका गुन्ह्यात शिक्षा झाल्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. नाशिक सत्र न्यायालयाने शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याच्या प्रकरणात त्यांना एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. याच आधारे अमरावती बँकेतील संचालक हरिभाऊ मोहोड आणि इतर ११ संचालकांनी कडू यांच्या अध्यक्षपदाला आव्हान देत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर विभागीय सहनिबंधकांनी ही कारवाई केली आहे.
दरम्यान, बच्चू कडू यांनी केलेल्या आंदोलनामुळे शेतकरी कर्जमाफीचा विषय पुन्हा चर्चेत आला होता. सरकारला ‘समिती नेमून निर्णय घेऊ’ असं आश्वासन द्यावं लागलं होतं. या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाची रद्दबातल कारवाई झाल्याने, संयोग वा दबाव — हे राजकीय चर्चेचे नवे मुद्दे ठरू लागले आहेत.
"भाजपचा दबाव आम्हाला झुकवू शकत नाही. आमच्या अंगात रक्ताचा थेंब शिल्लक असेपर्यंत आम्ही शेतकऱ्यांसाठी लढत राहू," असा स्पष्ट इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. मात्र सत्तेवर आल्यावर अर्थसंकट व निवडणुकीतील विजयामुळे सरकार अडचणीत येईल, अशी शक्यता कमी होती. तरीही अवघ्या सहा महिन्यांत बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे शासनाला पाठपिशवीची भूमिका घ्यावी लागली.