| सांगली समाचार वृत्त |
सांगली - बुधवार दि. २५ जून २०२५
२५ जून १९७५ — भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक काळा दिवस. याच दिवशी देशात आणीबाणी लागू करत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संविधानाचे उल्लंघन करून नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावून घेतले होते. अनेक निष्पाप नागरिक, पत्रकार, राजकीय कार्यकर्ते आणि विचारवंतांना विनाकारण तुरुंगात डांबण्यात आले होते. याच घटनेच्या स्मरणार्थ आज आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात आणीबाणी काळात अन्याय सहन केलेल्या संघर्षकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात बोलताना आ. सुधीरदादा गाडगीळ म्हणाले की, २५ जून १९७५ रोजी लादलेली आणीबाणी म्हणजे लोकशाहीवरील थेट हल्ला होता. त्या काळातील हजारो कुटुंबांवर संकट ओढवलं होतं. तीन लाखांहून अधिक नागरिकांना विनाअपराध तुरुंगात टाकण्यात आलं. अनेकांच्या आयुष्यावर खोल ओरखडे उठले. देशात हुकूमशाहीची छाया पसरली होती. पण त्या अंधारातही लोकशाहीचा उजेड जपणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी तितक्याच ताकदीने लढा दिला.
ते पुढे म्हणाले, "भारताचे संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी जे थोर नेते त्या काळात उभे राहिले, त्यांचं स्मरण आजही प्रेरणादायी आहे. जर त्यांनी तेव्हा लढा दिला नसता, तर भारताची परिस्थिती पाकिस्तानसारखी झाली असती. आज लोकशाही जिवंत आहे, ती त्या संघर्षाचे फलित आहे."
या प्रसंगी भाजपा राष्ट्रीय परिषद सदस्य प्रकाश बिरजे, ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे, महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस स्वातीताई शिंदे, जिल्हा सरचिटणीस विद्यजीत पाटील, तसेच अविनाश मोहिते, मोहन बाटवे, गीताताई पवार, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा गीतांजलीताई ढोपे-पाटील, जिल्हा उपाध्यक्ष हेमलताताई मोरे, ईशा साठे आणि स्वातंत्र्य सेनानींच्या कुटुंबीयांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकशाही मूल्यांची जपणूक करणाऱ्या या हिरकणींना समाजाच्या वतीने कृतज्ञतेची मानवंदना देण्यात आली.