yuva MAharashtra वीज ग्राहकांसाठी दिलासादायक घोषणा : ५ वर्षांत वीजदरात २६% कपात, पहिल्याच टप्प्यात १०% घट

वीज ग्राहकांसाठी दिलासादायक घोषणा : ५ वर्षांत वीजदरात २६% कपात, पहिल्याच टप्प्यात १०% घट



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - बुधवार दि. २५ जून २०२५

महाराष्ट्रातील सर्व वीज ग्राहकांसाठी सुखद वार्ता! राज्यात पहिल्यांदाच वीजदर कमी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून, पुढील पाच वर्षांमध्ये वीजदरात टप्प्याटप्प्याने एकूण २६ टक्के कपात होणार आहे. या निर्णयामुळे घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहक सर्वांनाच मोठा दिलासा मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर या निर्णयाची माहिती देताना सांगितले की, "पूर्वी वीजदरवाढीच्या याचिका नेहमीच सादर होत असत, पण यंदा महावितरणनेच वीजदर कमी करण्यासाठी याचिका दाखल केली आणि महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) त्यावर सकारात्मक निर्णय दिला."

मुख्यमंत्र्यांच्या मते, राज्यात 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण सुमारे 70% आहे, आणि या गटातील ग्राहकांना दरात सर्वाधिक कपात मिळणार आहे – थेट 10% इतकी. ही कपात सर्वसामान्य जनतेसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
राज्य शासनाने वीजदर कपात करून ग्राहकहिताला प्राधान्य दिले असून, ही योजना हळूहळू राबवली जाणार आहे. पाच वर्षांत ग्राहकांना एकूण २६ टक्क्यांपर्यंत दर कमी झाल्याचा थेट लाभ मिळेल.