सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे उपायुक्त वैभव विजय साबळे यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्यानंतर अखेर त्यांच्यावर प्रशासनाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नगरविकास विभागाच्या आदेशानुसार ९ जूनपासूनच ही अंमलबजावणी करण्यात आली आहे.
एका २४ मजली इमारतीच्या बांधकामासाठी परवानगी मिळवून देण्याच्या बदल्यात साबळे यांनी तब्बल १५ लाख रुपयांची लाच मागितल्याचे उघडकीस आले होते. तडजोडीअंती ही रक्कम सात लाखांवर निश्चित झाली होती. तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार ९ जून रोजी झालेल्या सापळ्यात साबळे हे लाच घेताना पकडले गेले. ही कारवाई उपअधीक्षक अनिल कटके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या प्रकरणानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. काही बिल्डर व व्यावसायिकांनी आनंदोत्सव साजरा करत फटाके फोडले होते. सांगलीतच नव्हे तर इस्लामपूर व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्ग भागातसुद्धा आनंद व्यक्त करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतरही साबळे यांच्यावर तात्काळ कोणतीही प्रशासकीय कारवाई झाली नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली होती. मात्र अखेर तब्बल पंधरवड्यानंतर नगरविकास विभागाने कारवाई करत निलंबनाचे आदेश महापालिकेला पाठवले.
दरम्यान, या प्रकरणात तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांचेही नाव चर्चेत आले होते. मात्र प्राथमिक चौकशीनंतर लाचलुचपत विभागाने त्यांना क्लीन चिट दिली आहे. मात्र तक्रारदार तानाजी रुईकर यांनी त्यांनाही सहआरोपी करण्याची मागणी करत न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला आहे.