फोटो सौजन्य : चॅट जीपीटी
| सांगली समाचार वृत्त |
मिरज - शुक्रवार दि. २७ जून २०२५
सांगली शहरातील सिव्हिल हॉस्पिटल रोडवर आज सकाळी झालेल्या दुर्दैवी अपघातात 21 वर्षीय तरुणीचा जीव गेला. जयमातृभूमी व्यायाम मंडळासमोर सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयाकडे निघालेली शर्वरी कुलकर्णी या विद्यार्थिनीच्या दुचाकीला मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसची धडक बसली. या अपघातात मागच्या चाकाखाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
शर्वरी हरिपूर येथे आई व बहिणीसोबत राहत होती. तिचे वडील काही वर्षांपूर्वी काळाच्या पडद्याआड गेले होते. ती सांगलीतील एका महाविद्यालयात बीसीएच्या अभ्यासक्रमात शिक्षण घेत होती. अपघातानंतर घटनास्थळी एकच गर्दी झाली. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी तात्काळ मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवला.
दरम्यान, शहरात अवघ्या तीन दिवसांत दोन महिलांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना हळहळजनक आहे. यापूर्वी विश्रामबाग उड्डाणपुलावर भरधाव डंपरच्या धडकेत पूनम गोविंद नलवडे (वय २५, रा. कवलापूर, ता. मिरज) या विवाहितेचा मृत्यू झाला होता. पतीसोबत कामावर जाताना त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली होती. हृदयद्रावक ठरलेली ही घटना तिच्या पतीच्या डोळ्यांदेखत घडली.
सांगलीतील या सलग अपघातांनी शहरात शोककळा पसरली असून, सुरक्षित वाहतुकीबाबत गंभीर चिंतन करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.