| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - बुधवार दि. २५ जून २०२५
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आयोजित मानाचा 'बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार' यंदा ज्येष्ठ पत्रकार व संपादक मधुकर भावे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच, महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे संपादक महेश म्हात्रे यांना ‘आचार्य अत्रे स्मृती पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
हा भव्य पुरस्कार वितरण समारंभ २ जुलै २०२५ रोजी दुपारी ४ वाजता, मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान, मुंबई येथे पार पडणार आहे. या विशेष प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व विचारवंत डॉ. नरेंद्र जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर व सरचिटणीस एस. एम. देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात लक्षणीय योगदान देणाऱ्या निवडक पत्रकारांचा दरवर्षी यशस्वी सन्मान परिषदेच्या वतीने केला जातो. यंदा एकूण १० पत्रकार, तसेच एक ज्येष्ठ नाट्यकर्मी अशा विविध मान्यवरांचा सन्मान होणार आहे.
पुरस्कारांची सविस्तर यादी:
बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार : मधुकर भावे (ज्येष्ठ संपादक)
आचार्य अत्रे स्मृती पुरस्कार : महेश म्हात्रे (महाराष्ट्र रिसर्च सेंटर)
शशिकांत सांडभोर पुरस्कार (इलेक्ट्रॉनिक मीडिया) : अभिजित कारंडे (मुंबई तक)
स्व. पत्रकार प्रमोद भागवत स्मृती पुरस्कार : अमेय तिरोडकर
भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्कार : पांडुरंग पाटील (अमळनेर)
नागोजीराव दुधगावकर पुरस्कार : सर्वोत्तम गावस्कर (सुराज्य दैनिक, बीड)
कै. दत्ताजीराव तटकरे स्मृती पुरस्कार : दिनेश केळुसकर (दैनिक हेराल्ड)
सावित्रीबाई फुले महिला पत्रकारिता पुरस्कार : सीमा मराठे (सिंधुदुर्ग)
स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशमुख कृषी पत्रकारिता पुरस्कार (नवीन): बाळासाहेब पाटील (ग्रोवन)
संतोष पवार स्मृती पुरस्कार (प्रसिद्धी प्रतिनिधी) : भरत निगडे (पुणे)
या कार्यक्रमात नाट्य व रंगभूमी क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार भरत जाधव यांचाही विशेष गौरव करण्यात येणार आहे.
परिषद कार्यकारिणीतर्फे सर्व पत्रकार, लेखक, वाचक व रसिक यांना या गौरव सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये प्रमुख सहभाग किरण नाईक, शरद पाबळे, शिवराज काटकर, सुरेश नाईकवाडे, मन्सूरभाई शेख, दीपक कैतके आणि राजा आदाटे यांचा असणार आहे.