| सांगली समाचार वृत्त |
मिरज - बुधवार दि. २५ जून २०२५
पृथ्वीराज गुलाबराव पाटील या व्यक्तीच्या अंगावर राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रातील डाग असेल तर विरोधकांनी तो शोधून दाखवावा. त्यांनी एखादी संस्था बुडवली असेल, एखाद्या व्यक्तीची ठेव बुडवून संसार उद्ध्वस्त केला असेल, वाडवडिलांनी मिळवलेली पुण्याई धुळीला मिळवली असेल तर शोधून दाखवावी. ते सत्ताधारी पक्षातील नेत्यांना सांगलीच्या विकासाच्या मुद्यावर भेटतात. त्यांनी स्वार्थासाठी कुणाचे पाय धरलेले नाहीत, असे प्रत्युत्तर काँग्रेसचे माजी नगरसेवक दिलीप पाटील, विजय घाडगे, रविंद्र वळवडे आणि अल्ताफ पेंढारी यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिले आहे.
माजी महापौर किशोर शहा यांच्यासह मदनभाऊ समर्थकांनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यात म्हटले आहे, की २०१४ ला भाजपची सत्ता आल्यानंतर काँग्रेसचे नेते घरात लपून बसले होते. लाभार्थी पळून गेले होते. त्यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी मोजके लोक सोबत घेऊन विरोधाचा झेंडा फडकत ठेवला. नागरी प्रश्नांवर आक्रमक पवित्रा घेतला. काँग्रेस जीवंत ठेवली. त्याचे बक्षिस म्हणून पक्षाने २०१९ ला विधानसभेची उमेदवारी दिली आणि सांगलीकरांनी भरभरून मतदानदेखील केले. त्यावेळी विजय निश्चित झाला असता, मात्र ‘आम्ही नाही तर कुणीच नाही’ हे काहींचे घातकी धोरण आडवे आले.
पृथ्वीराज पाटील यांच्या अंगावर डाग विरोधकांनी शोधून दाखवावा, बाबाप्रेमींचे खुले आव्हान काय आहे, हे घरातून बाहेर पडून पहावे. निवडणुका आल्यानंतर घर सोडणाऱ्यांना लोकांनी जागा दाखवलेली आहे. पृथ्वीराज पाटील भानगडी लपवण्यासाठी भाजपात निघाले आहेत का ? असे म्हणणाऱ्यांनी दिव्याखालचा अंधार पहावा. सांगली महापुरात कुणामुळे बुडते ? कुणी भूखंडाचे श्रीखंड खाल्ले ? ओतांचा बाजार कुणी केला? नाले कुणी हडप केले? बीओटीचा बाजार मांडून सांगली कुणी लुटली, हे सांगलीकरांना तोंडपाठ आहे. राहिला विषय, नगरसेवक निवडून आणण्याचा तुम्हा लोकांना तुमच्या नेत्याचे ‘डिपॉझिट वाचवता आले नाही, त्याचे काय करायचे, यावर मंथन करा. आमची चिंता करू नका, आमच्या सदऱ्यावर डाग नाही, असे उत्तरही त्यांनी दिले आहे.
पृथ्वीराज पाटील यांनी शेतकरी बँकेतील पैशासंदर्भात ठेवीदारांच्या पैशाची काळजी घेतली, हे उघडच आहे. शेतकरी बँकेतील कोट्यावधीची कर्जे कोणाच्या सांगण्यावरून कोणाला दिली? बोगस कर्जदार कसे उभे केले, त्याचा लाभ कोणी कोणी घेतला, याचा खुलासा किशोर शहा, संतोष पाटील, उत्तम साखळकर यांनी करावा, असेही या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.