| सांगली समाचार वृत्त |
मिरज - बुधवार दि. २५ जून २०२५
सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील हालचालींना वेग आला आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिंदे गटाच्या शिवसेनेत आपापल्या प्रभावशाली नेत्यांना आपल्या गोटात खेचण्यासाठी चढाओढ सुरू आहे. काँग्रेसच्या बंडखोर नेत्या जयश्री पाटील यांना राष्ट्रवादीने आपल्याकडे घेण्यासाठी तयारी केली होती. मात्र, भाजपने रणनीती आखत त्यांना कमळ हाती दिले आणि राष्ट्रवादीचा डाव उधळला.
याच पार्श्वभूमीवर मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगली महापालिकेसह राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचाच झेंडा फडकवेल, असा विश्वास व्यक्त केला. मात्र, त्याच पक्षाचे आमदार इद्रीस नायकवडी यांनी महापौर राष्ट्रवादीचाच असेल, असे ठाम मत मांडत वादाला तोंड फोडले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर महायुतीतील अंतर्गत समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मेळाव्याला आमदार नायकवडी, शहराध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी महापौर दिग्विजय सुर्यवंशी, राधिका हारगे, महादेव दबडे, देवजी साळुंखे, विष्णू माने, जमिल बागवान आदी उपस्थित होते.
मंत्री मुश्रीफ यांनी भाषणात सांगितले की, महायुती सरकार सर्वसामान्यांसाठी कार्यरत असून, सर्व जाती-धर्मांच्या हितासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यामुळे जनतेत महायुतीबाबत सकारात्मक वातावरण आहे. काही महिन्यांत महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार असून, त्यातही महायुतीच वर्चस्व राखेल, असा त्यांचा दावा होता.
शिवसेना (शिंदे गट) प्रमुख विजय शिंदे, ठाकरे गटाचे चंद्रकांत मैगुरे यांच्यासह अनेकांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला की, कोणतेही आमिष न दाखवता जनतेच्या ह्रदयात स्थान मिळवा, त्यांच्या समस्या सोडवा, तरच मतं मिळतील. तसेच प्रत्येक वॉर्डात चार उमेदवार असतील तर एका कमजोर उमेदवारामुळे बाकी तिघांचाही पराभव होऊ शकतो, त्यामुळे इच्छुकांची संख्या कितीही असली तरी सर्व्हे करून उमेदवार ठरवा, असेही त्यांनी सुचवले.
मात्र, इद्रीस नायकवडी यांच्या विधानामुळे पेच निर्माण झाला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, पुढचा महापौर हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल. महायुती म्हणून निवडणूक लढायची की स्वतंत्र, हा निर्णय अजून घेतलेला नसला तरी प्रत्येक प्रभागात आमच्याकडे सक्षम कार्यकर्ते आहेत. आमचं संघटन मजबूत असून आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहोत, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. त्यांच्या या भूमिकेमुळे महायुतीतील ‘स्वबळ’ आणि ‘सहबळ’ या दोन धारांचा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. विशेषतः भाजपसाठी ही स्थिती राजकीय संधी ठरू शकते.