| सांगली समाचार वृत्त |
बारामती - बुधवार दि. २५ जून २०२५
राज्याच्या राजकीय व सहकारी क्षेत्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा थरार अखेर संपला असून, अजित पवारांच्या नेतृत्वाखालील श्री नीलकंठेश्वर पॅनलने २१ पैकी तब्बल २० जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. मात्र, या एकतर्फी विजयाच्या रेषेत एक अपवाद ठरले — विरोधी पॅनलचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे, जे एकमेव उमेदवार म्हणून विजयी झाले.
सहकार बचाव पॅनलचे प्रमुख रंजनकुमार तावरे — जे कारखान्याचे माजी अध्यक्षही होते — त्यांना ५९३ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. ही बाब विरोधकांसाठी मोठा धक्का मानली जात आहे.
मतमोजणीच्या दोन दिवसांत चुरस कायम होती. काही गटांमध्ये थेट पॅनल-टू-पॅनल टक्कर पाहायला मिळाली, तर काही ठिकाणी क्रॉस व्होटिंगचा प्रभावही जाणवला. सुरुवातीस राखीव गटांमध्ये श्री नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार ४००-५०० मतांनी आघाडीवर होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदा या निवडणुकीसाठी स्वतः मैदानात उतरत जोरदार मोर्चेबांधणी केली होती. ब वर्ग संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून ते स्वतः विजयी झाले, आणि पॅनलच्या विजयाची सुरुवात झाली.
२४ जून रोजी सकाळी ९ वाजता सुरू झालेली मतमोजणी पुढील दिवशीही सुरू राहिली. सुरुवातीला विरोधी पॅनलच्या काही उमेदवारांनी आघाडी घेतली होती, मात्र दुसऱ्या फेरीपासून चित्र बदलले. चंद्रराव तावरे वगळता सर्व विरोधक मागे पडले आणि श्री नीलकंठेश्वर पॅनलने बहुतेक जागांवर विजय मिळवला.
शेवटच्या टप्प्यात चंद्रराव तावरे यांनी ५०० पेक्षा अधिक मतांनी आघाडी घेत आपले स्थान राखले. उर्वरित विजयी उमेदवारांमध्ये बाळासाहेब तावरे, तानाजीराव कोकरे, योगेश व स्वप्निल जगताप, नितीन सातव, देवकाते कुटुंबातील तिघे यांचा समावेश आहे.
या निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मतमोजणी संपताच कार्यकर्त्यांनी जल्लोषात गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.