yuva MAharashtra आणीबाणीला पन्नास वर्षे : लोकशाहीच्या संघर्षाची स्मृती जागविणारे छायाचित्र प्रदर्शन

आणीबाणीला पन्नास वर्षे : लोकशाहीच्या संघर्षाची स्मृती जागविणारे छायाचित्र प्रदर्शन


| सांगली समाचार वृत्त |
मिरज - बुधवार दि. २५ जून २०२५

२५ जून १९७५ रोजी देशात लागू झालेल्या आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने त्या ऐतिहासिक काळातील घटनांचा वेध घेणारे एक विशेष छायाचित्र प्रदर्शन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते उद्घाटन करून सुरू करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रंथालयात भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, तहसीलदार लीना खरात आणि माहिती विभागाचे कर्मचारी यांची उपस्थिती लाभली.

१९७५ ते १९७७ या काळात देशात लागू करण्यात आलेली आणीबाणी ही भारतीय लोकशाहीसाठी एक कठीण परीक्षा होती. त्या काळात मूलभूत हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि माध्यमांचा आवाज दाबण्यात आला होता. या आव्हानात्मक काळात अनेकांनी निर्भयतेने लढा दिला, तुरुंगवास पत्करला आणि लोकशाहीच्या मूल्यांना टिकवून ठेवण्याचे कार्य केले.


या संघर्षाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आयोजित केलेल्या प्रदर्शनात विविध ऐतिहासिक छायाचित्रांचा समावेश आहे. यामध्ये भारतातील प्राचीन लोकशाही परंपरा, आणीबाणी जाहीर करताना प्रसिद्ध झालेले राजपत्र, प्रसारमाध्यमांवरील निर्बंध, जनतेने केलेले विरोधाचे आंदोलन, आणि आणीबाणीनंतर पुन्हा लोकशाही मूल्यांच्या पुनर्स्थापनेसाठी झालेले प्रयत्न अशा अनेक पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

हे छायाचित्र प्रदर्शन पुढील एक महिना सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. लोकशाहीच्या इतिहासात रस असलेल्या प्रत्येक नागरिकाने या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व माहिती विभागाने केले आहे.