| सांगली समाचार वृत्त |
सांगली - बुधवार दि. २५ जून २०२५
अलमट्टी आणि हिप्परगी धरणातील पाण्याची अचूक माहिती सातत्याने मिळावी यासाठी सांगली पाटबंधारे विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. विभागाकडून एकूण ३२ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, २९ जूनपासून १५ ऑक्टोबरपर्यंत या अधिकाऱ्यांचे ड्युटीवर फेरबदल करत ठिकाणी पाठवले जाणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे धरणांत वेगाने पाण्याची आवक होत आहे. अलमट्टी धरणात सध्या दररोज ७६ हजार ७०१ क्युसेकने पाणी येत असून, ७० हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. एकूण साठा ७६.५९ टीएमसीपर्यंत पोहोचला असून धरण ६२ टक्के भरले आहे. मागील वर्षी याच तारखेला साठा केवळ २५ टक्के होता. या तुलनेत यंदा धरण भरत असल्याने कृष्णा, वारणा व पंचगंगा नदीकाठी असणाऱ्या नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
याच पार्श्वभूमीवर, पाटबंधारे विभागाने अलमट्टी धरणावर १६ आणि हिप्परगी बॅरेजवर १६ अधिकारी नेमले आहेत. हे अधिकारी रोज बदलून तिथे ड्युटीवर असतील आणि प्रत्येक तासाला धरणातील पाण्याचा साठा, विसर्ग, व दरवाजे उघडले असल्यास त्याची माहिती सांगलीतील पूर नियंत्रण कक्षाला देणार आहेत.
शिस्तभंग कारवाई होणार
नियुक्त अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी न बजावल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा व महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. वेळेवर ठिकाणी उपस्थित राहणे बंधनकारक असून कामात कसूर केल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आदेशही दिले गेले आहेत.