yuva MAharashtra मशिदीवरील भोंग्यांबाबत अजित पवारांच्या मध्यस्थीने बैठक; मुस्लिम नेत्यांचा सरकारकडे ठाम पवित्रा

मशिदीवरील भोंग्यांबाबत अजित पवारांच्या मध्यस्थीने बैठक; मुस्लिम नेत्यांचा सरकारकडे ठाम पवित्रा


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - बुधवार दि. २५ जून २०२५

राज्यात मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, आमदार अबू आझमी, नवाब मलिक, झीशान सिद्दीकी, सना मलिक यांच्यासह विविध मुस्लिम संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

मशिदींवरील भोंगे हटवण्याची कारवाई जबरदस्तीने केली जात असल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात आला. त्यांनी असा दावा केला की भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या दबावामुळेच पोलीस यंत्रणा कारवाई करत आहे.

"सोमय्यांनी  दूर राहावं" – अजित पवार यांचा इशारा

या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, किरीट सोमय्या यांनी मशिदींमध्ये जाणे टाळावे, कारण त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यांनी सांगितलं की, पोलिसांनी नियमांची अंमलबजावणी करताना कुणाही समुदायाशी अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी.


बैठकीदरम्यान पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करून दाखवले की, न्यायालयाने घालून दिलेली 46 ते 56 डेसिबलची मर्यादा खऱ्या परिस्थितीत शक्य नसते. उपस्थितांमध्ये झालेल्या चर्चेचाही आवाज या मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे त्यांनी दाखवून दिले.

अजित पवार यांनी पोलीस महासंचालक व आयुक्तांना निर्देश दिले की, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई जरूर करावी, मात्र ती प्रक्रिया पारदर्शक आणि कायदेशीर असावी.

"गोंधळ झाला, तर जबाबदार कोण?" 

पोलीस आयुक्तांनी माहिती दिली की, आतापर्यंत मुंबईत सुमारे 1500 भोंगे उतरवण्यात आले आहेत. या कारवाईबाबत मुस्लिम संघटनांनी रोष व्यक्त केला असून त्यांनी इशारा दिला की, जर किरीट सोमय्या यांच्या हस्तक्षेपामुळे वातावरण तापले, तर त्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.

अजित पवारच का?

महायुती सरकारमधील मुस्लिम समाजासाठी विश्वासार्ह चेहरा म्हणजे अजित पवार, असा विश्वास मुस्लिम संघटनांनी व्यक्त केला. सरकारमध्ये असूनही त्यांनी मुस्लिम समाजापासून अंतर न ठेवता प्रत्येक संवेदनशील प्रकरणात तटस्थ आणि धर्मनिरपेक्ष भूमिका घेतली आहे. विशाळगडमधील घरांच्या अतिक्रमण प्रकरणापासून ते मीरा रोड दंगलीपर्यंत – अजित पवार यांनी घेतलेली भूमिका मुस्लिम समाजाला आश्वासक वाटली आहे. त्यामुळेच भोंग्यांच्या वादावर न्याय मिळवण्यासाठी त्यांच्याकडेच मुस्लिम समाजाचा कल अधिक आहे. "इतर मंत्र्यांकडून अपेक्षा नाही," हे त्यांचे स्पष्ट मत आहे.