yuva MAharashtra विविधतेचा सन्मान करा, देशहितावर लक्ष केंद्रित ठेवा – सरसंघचालक मोहन भागवत यांचा संदेश

विविधतेचा सन्मान करा, देशहितावर लक्ष केंद्रित ठेवा – सरसंघचालक मोहन भागवत यांचा संदेश


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - शुक्रवार दि. ६ जून २०२५

नागपूर – "भारतीय समाज हा विविधतेने नटलेला आहे. इथे प्रत्येकाची जीवनशैली, श्रद्धा, परंपरा आणि सण साजरे करण्याची पद्धत वेगळी असली तरी आपल्या साऱ्यांचं मूळ एकच आहे," असे विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

नुकत्याच पार पडलेल्या संघाच्या तृतीय वर्ष शिक्षण वर्गाच्या समारोप कार्यक्रमात बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "भारत हा केवळ एक भूमी नाही, तर एक विचार आहे. इथं प्रत्येकाला आपल्या श्रद्धेनुसार धर्म आणि उपासना पद्धती पाळण्याचा अधिकार आहे. कोणावरही आपली मते लादू नयेत."

या भाषणातून त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपा नेत्यांना इशारा दिल्याचे समजते, जे अलीकडे भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर, ईद आणि कुर्बानी संदर्भात उत्तेजक विधानं करत आहेत. अशा अतिउत्साही मतप्रदर्शनामुळे समाजात तणाव निर्माण होतो, हे त्यांनी सूचित केलं.


भागवत म्हणाले की, "आपण सर्वजण सनातन संस्कृतीतून उद्भवलेले आहोत. काही बदल हे भौगोलिक व सामाजिक परिस्थितीमुळे आले असले तरी आपली मूळ भावना एकच आहे. ब्रिटीशांनी आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला आणि आपली ओळख विसरायला लावली. ती पुन्हा जागवण्याची गरज आहे."

त्यांनी येशू आणि पैगंबर मोहम्मद यांच्यावरील श्रद्धेचाही उल्लेख केला आणि सांगितले की, कोणत्याही श्रद्धेचा द्वेष केला जाऊ नये. "विविधता ही आपल्या देशाची ताकद आहे. पण तीच विविधता काही वेळा मतभेदांचं कारण बनू शकते. त्यामुळे संयम ठेवणे गरजेचे आहे."

ते पुढे म्हणाले, "स्वातंत्र्याच्या आधी विदेशी सत्तेविरोधात आक्रमक भूमिका आवश्यक होती. मात्र आता आपला देश स्वतंत्र आहे, संविधान आपले आहे, कायदे आपल्याच हातात आहेत. म्हणूनच कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करताना जबाबदारीने विचार करावा."

देशाच्या सुरक्षेबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, "युद्ध फक्त शस्त्रांनी जिंकता येत नाही. समाजात एकात्मता हवी, देशासाठी निःस्वार्थ भावना हवी. पाकिस्तान आपल्याविरोधात अप्रत्यक्ष युद्ध लढत आहे, अतिरेक्यांचा वापर करत आहे. त्याला उत्तर देण्यासाठी फक्त सैन्य नव्हे, तर समाजाची एकजूट आणि सजगता ही खरी गरज आहे."

सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या भाषणातून विविधतेचा आदर राखण्याचे आणि देशहिताला सर्वोच्च मान देण्याचे आवाहन करत संयम, सहिष्णुता आणि एकतेचा संदेश दिला आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आणि अतिउत्साही विधान करणाऱ्यांपासून सावध राहण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.