yuva MAharashtra आरसीबीच्या ऐतिहासिक विजयोत्सव दुर्दैवी घटनेमुळे BCCI चे नवे दिशादर्शक

आरसीबीच्या ऐतिहासिक विजयोत्सव दुर्दैवी घटनेमुळे BCCI चे नवे दिशादर्शक


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - शुक्रवार दि. ६ जून २०२५

आयपीएल 2025 चा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकत आपली पहिलीच ट्रॉफी उंचावली आणि संपूर्ण देशभरात आनंदोत्सवाला सुरुवात झाली. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बंगळुरू संघाने जेतेपद मिळवल्याने चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली.

मात्र या विजयाच्या जल्लोषाला एका दुर्दैवी घटनेची किनार लागली. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर विजयानंतर जमलेल्या प्रचंड गर्दीत चेंगराचेंगरी झाली आणि 11 निष्पाप चाहत्यांचा जीव गेला. ही घटना सर्वांसाठी धक्कादायक ठरली.


या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) लवकरच एक नवा दिशानिर्देश तयार करणार आहे. विजयानंतर होणाऱ्या मिरवणुकांबाबत अधिक नियोजनबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने पुढे जाण्यासाठी आराखडा आखण्यात येणार आहे.

BCCIचे सचिव देवजीत सैकिया यांनी या घटनेवर दुःख व्यक्त करत 'इंडियन एक्सप्रेस'ला सांगितले, “प्रत्येक हंगामात एक संघ जिंकतो आणि त्यांच्या शहरात मोठा उत्सव होतो. पण अशा दुर्घटना टाळण्यासाठी आम्हाला काळजीपूर्वक नियोजन करणे आवश्यक आहे. सध्या विजयी मिरवणुकांवर आमचे थेट नियंत्रण नसले तरी भविष्यात सुरक्षा आणि व्यवस्थापनाबाबत आवश्यक पावले उचलली जातील.”

ही घटना क्रिकेटप्रेमींसाठी एक मोठा धडा ठरली असून, अशा प्रसंगी उत्साहातही संयम आणि सुरक्षेचं भान राखणं किती आवश्यक आहे, हे अधोरेखित झालं आहे.