| सांगली समाचार वृत्त |
कोल्हापूर - शुक्रवार दि. ६ जून २०२५
विशाळगडावर दरवर्षी मलिक रेहान नावाच्या ऐतिहासिक मुस्लिम व्यक्तीच्या नावाने बकरी ईदच्या दिवशी उरूस भरवला जातो. मात्र हा उरूस पूर्णपणे बेकायदेशीर असून, त्या निमित्ताने गडावर बोकड व कोंबड्यांची कत्तल, मांस शिजविणे आणि मद्यप्राशन केले जाते. हे संपूर्ण गडाच्या पावित्र्यावर आणि त्याच्या ऐतिहासिक वारशावर कलंक आहे, असा आरोप हिंदू एकता आंदोलनाने केला आहे.
हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार नितीन शिंदे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, विशाळगडावर यंदाही जर अशा प्रकारचा उरूस भरवण्याचा प्रयत्न झाला, तर तो कोणत्याही परिस्थितीत होऊ दिला जाणार नाही.
ते म्हणाले, “बकरी ईदच्या नावाखाली मलिक रेहान उरूस भरवण्याचे कारस्थान सुरू आहे. यासाठी न्यायालयात दिशाभूल करणारी याचिका दाखल करून कुर्बानीसाठी परवानगी घेण्यात आली आहे. मात्र या आडूनच बेकायदेशीर उरूस भरवला जात आहे.”
शिंदे यांनी यावेळी स्मरण करून दिले की, बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीद यांच्या बलिदानाने पावन झालेला विशाळगड, दारू व मासाहाराने अपवित्र केला जातो आहे, हे अत्यंत खेदजनक आहे. गेल्या वर्षी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने उरूसावर बंदी घातली होती, हे त्यांनी विशेषतः अधोरेखित केले.
“गडावर कुठल्याही सण-उत्सवाच्या नावाखाली बोकड-कुक्कुट कत्तल आणि दारूपान सहन केला जाणार नाही. गड हा पवित्र संग्रामभूमी आहे, बाजारपेठ नव्हे. मुस्लिम बांधवांना जर बकरी ईद साजरी करायची असेल, तर त्यांनी आपल्या घरी – गडाच्या पायथ्याशी असलेल्या मुसलमावाडी किंवा गजापूर गावात – शांततेने साजरी करावी,” असे ठाम मत त्यांनी मांडले.
त्यांनी राज्य शासनालाही आवाहन केले की, गडावर कायमस्वरूपी कत्तल व मांस शिजवण्यावर आणि दारूपानावर बंदी राहावी, आणि कायदा-सुव्यवस्था भंग होणार नाही, यासाठी दक्षता घ्यावी.