| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - गुरुवार दि. ५ जून २०२५
18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने अखेर IPL ट्रॉफी जिंकली आणि शहरात जल्लोषाची लाट उसळली. विजयानंतर संघासाठी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, हा आनंद काही वेळातच दुर्दैवात बदलला.
स्टेडियमच्या बाहेर लाखो चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली आणि ती नियंत्रणाबाहेर गेल्याने चेंगराचेंगरी झाली. या घटनेत ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर ४७ जण जखमी झाले. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असून, राजकारणालाही पेटाळा फुटला आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या संदर्भात वक्तव्य करताना चेंगराचेंगरीची तुलना कुंभमेळ्यातील घटनेशी केली. "कुंभमेळ्यातही ५०-६० लोक मृत्युमुखी पडले होते, तिथे आम्ही टीका केली नव्हती, इथे काँग्रेसवर का?" असा प्रश्न त्यांनी विचारला. मात्र त्यांच्या या तुलनेमुळे नवीन वाद उफाळून आला आहे.
भाजपने यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस सरकारच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करत, सरकारकडून कोणतेही योग्य नियोजन किंवा सुरक्षा व्यवस्था नव्हती, अशी टीका करण्यात आली. सरकारने मात्र याला नकार देत जबाबदारी कर्नाटक क्रिकेट असोसिएशनवर टाकली आहे.
दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून, या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.