yuva MAharashtra चमकोगिरी करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

चमकोगिरी करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

फोटो सौजन्य : फेसबुक वॉलवरुन 

| सांगली समाचार वृत्त |
नाशिक - शुक्रवार दि. ६ जून २०२५

राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून सर्वच पक्षांनी तयारीला जोर दिला आहे. नाशिकमध्ये आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने एक भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट निवडणुकीची संभाव्य तारीख सांगत, भाजपच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरायला सज्ज राहण्याचा इशारा दिला.

"नेत्यांमागे फिरून उपयोग नाही" – बावनकुळे यांचा स्पष्ट संदेश

या मेळाव्यात बोलताना बावनकुळे यांनी नेत्यांच्या मागे फिरणाऱ्यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, चमकदार उपस्थिती किंवा चमकोगिरी करून तिकीट मिळणार नाही. काम करणाऱ्यालाच संधी दिली जाईल, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. त्यामुळे भाजपच्या इच्छुक कार्यकर्त्यांना आता प्रत्यक्ष कामगिरी करून स्वतःचं स्थान पक्कं करावं लागणार आहे.


मोदी सरकारच्या 11 वर्षांचा आढावा

भाजप सरकारने गेल्या 11 वर्षांत घेतलेले निर्णय, विकासकामं आणि धोरणांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षाच्या वतीने विभागीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. या कार्यशाळेत बावनकुळे यांनी 15 ऑगस्ट रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील, असा ठोस दावा केला. प्रत्येक मत महत्त्वाचं असून, कोणताही भाजप कार्यकर्ता निवडणुकीत हरू नये हा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

"ऑपरेशन सिंदूर"चा उल्लेख

पुन्हा एकदा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत बावनकुळे यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून देशाचा बदला घेतल्याचं सांगितलं. हा निर्णय दुसऱ्या कोणत्याही सरकारने घेतला नसता, असंही ते म्हणाले.

गिरीश महाजनांचा 100+ चा निर्धार

या मेळाव्यात उपस्थित मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक महापालिकेसाठी "100 प्लस" असा नारा दिला. युती झाली तर ठीक, अन्यथा भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांमध्ये गटबाजी थांबवून एकत्रितपणे कामाला लागा, असा सल्लाही त्यांनी दिला.

विशेष म्हणजे, मेळाव्याचं सूत्रसंचालन करताना गिरीश महाजन यांचा संभाव्य पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.