| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - बुधवार दि. १८ जून २०२५
महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या स्त्रीसक्षमतेसाठी राबवलेल्या महत्त्वाकांक्षी योजनेवर आधारित एक भावस्पर्शी मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणाच्या उन्नतीसाठी सुरु झालेली ही योजना २८ जून २०२४ पासून प्रभावी झाली असून, २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा ₹१५०० इतका आर्थिक आधार या माध्यमातून दिला जातो.
या सामाजिक उपक्रमावर आधारित असलेला चित्रपट ‘लाडकी बहीण’ नावाने साकारला जात असून, या चित्रपटात लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. तिच्या जोडीला ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ अभिनेते अण्णा नाईक यांची दमदार साथ असणार आहे. या जोडीच्या सहज अभिनयातून उभा राहणारा अनुभव प्रेक्षकांसाठी लक्षवेधी ठरणार असल्याचा विश्वास चित्रपटाच्या निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.
ओम साई सिने फिल्म आणि शुभम फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त निर्मितीत तयार होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन गणेश शिंदे करत असून, पटकथा व संवाद लेखनाची जबाबदारी शितल गणेश शिंदे यांनी सांभाळली आहे. बाबासाहेब पाटील, अनिल वणवे आणि शितल शिंदे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.
या चित्रपटाचा भव्य शुभारंभ सातारा येथे पार पडला. या वेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. यावेळी आमदार अतुल भोसले, मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, सांस्कृतिक विभागाचे उपाध्यक्ष पंकज चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘लाडकी बहीण’ चित्रपट हा फक्त माहिती देणारा प्रकल्प नसून, त्यात वास्तव आणि मनोरंजनाचा सुरेख मेळ साधण्यात आला आहे. दिग्दर्शकांच्या म्हणण्यानुसार, सामाजिक भान असलेला विषय हृदयस्पर्शी पद्धतीने आणि हलक्याफुलक्या शैलीत मांडून एक प्रेरणादायी कथा प्रेक्षकांसमोर उभी केली जाणार आहे.
या चित्रपटाच्या माध्यमातून ‘लाडकी बहीण’ योजनेचा सामाजिक परिणाम, महिलांच्या जीवनातील बदल आणि त्यातून निर्माण होणारी सकारात्मक उर्जा मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. हा चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी एक अर्थपूर्ण आणि भावनिक प्रवास ठरणार आहे.