| सांगली समाचार वृत्त |
सांगली - बुधवार दि. १८ जून २०२५
सांगली जिल्ह्यातील गुंडेवाडी गावात राहणाऱ्या सात महिन्यांच्या गर्भवती ऋतुजा राजगे हिने ख्रिश्चन धर्मांतराच्या दबावामुळे आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे संतप्त झालेल्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावर कठोर भाष्य केले आहे. सांगलीत आयोजित मशाल मोर्चाच्या समारोपावेळी बोलताना त्यांनी धर्मांतराच्या घटना थोपवण्यासाठी ठोस कारवाईची गरज असल्याचे मत मांडले.
पडळकर यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करताना ऋतुजाला ‘धर्मवीर संभाजी महाराजांच्या विचारांची कन्या’ असे संबोधले. "धर्मासाठी हालअपेष्टा सहन करूनही झुकला नाही तो संभाजी, आणि त्याच विचारांची ही लेक होती," असे ते म्हणाले.
या वेळी बोलताना पडळकर यांनी धर्मांतर करणाऱ्यांबाबत कठोर भूमिका घेतली. "धर्मांतर करणारे गावात आले, तर त्यांना रोखले पाहिजे. जे त्यांना रोखतील, अशांना प्रोत्साहन म्हणून ११ लाखाचे बक्षीस दिले जावे. धर्मविरोधी कृत्यांवर कठोर उपाययोजना झाली पाहिजे. पोलिसांची जबाबदारी मी सांभाळेन," असे ते म्हणाले.
"लव्ह जिहाद करणारे हिरवे साप आहेत, तर ख्रिश्चन धर्मांतर करणारे अजगर आहेत. हे अजगर गावागावातून फिरू नयेत म्हणून कठोर पावले उचलली पाहिजेत," अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पुढे ते म्हणाले, "जिल्ह्यातील अवैध प्रार्थनास्थळांची यादी तात्काळ जाहीर करावी आणि तिसऱ्या दिवशी ती पाडण्यात यावी. असे झाले, तर आम्ही त्या अधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार करू. अन्यथा लोकशक्तीचा वापर करून पुढील आंदोलन उभारले जाईल."
सरकारी नोकरीत असणाऱ्या व्यक्तीने आरक्षणाचा लाभ घेत हिंदू म्हणून प्रवेश मिळवला, परंतु प्रत्यक्षात इतर धर्माचे आचरण करत असेल, तर अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.