yuva MAharashtra हुंडाई शोरूम चोरी प्रकरण उजेडात; मुख्य आरोपी गजेंद्र मोहिते अटकेत, चार जण फरार

हुंडाई शोरूम चोरी प्रकरण उजेडात; मुख्य आरोपी गजेंद्र मोहिते अटकेत, चार जण फरार


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - बुधवार दि. १८ जून २०२५

कोल्हापूर रोडवरील हुंडाई शोरूममध्ये झालेल्या मोठ्या चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) महत्त्वाची कामगिरी करत एका संशयिताला अटक केली आहे. दिनेश गजेंद्र मोहिते (वय २७, रा. लवाछा, ता. वापी, जि. बलसाड, गुजरात) असे अटकेत असलेल्या व्यक्तीचे नाव असून, त्याला गुजरातमधून ताब्यात घेऊन सांगली येथे आणण्यात आले आहे. त्याचे चार साथीदार सध्या फरार आहेत.

ही घटना १२ जून रोजी पहाटेच्या सुमारास घडली होती. अज्ञात चोरट्यांनी खिडकीच्या काचा फोडून शोरूममध्ये प्रवेश करत अंदाजे ९ लाख ६८ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले होते. प्रकरणाची चौकशी करत असताना एलसीबीच्या पथकाला हा गुन्हा आंतरराज्य टोळीने केल्याचे स्पष्ट झाले.

या माहितीच्या आधारे उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुजरातमधील बलसाड जिल्ह्यात धाडसत्र राबवले. शोधमोहीमेदरम्यान दिनेश मोहिते हा त्याच्या निवासाजवळ सापडला. त्याची सखोल चौकशी केल्यानंतर त्याने चोरीचे कृत्य कबूल केले असून, त्यामध्ये त्याला मुरली मनोहर पवार (उमरगाव, गुजरात), करण परलाल मोहिते (सायना, मालेगाव, जि. नाशिक), रोहित आणि अक्षय (पूर्ण नावे अद्याप स्पष्ट नाहीत) यांची साथ लाभली होती, अशी माहिती समोर आली आहे.


स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कुमार पाटील, हवालदार संदीप पाटील, बसवराज शिरगुपी, श्रीधर बागडी, सुशील म्हस्के, संदीप नलावडे, प्रकाश पाटील, ऋतुराज होळकर, अभिजीत माळकर, विनायक सुतार, सोमनाथ पतंगे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत असून, लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.