yuva MAharashtra जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षांतर्गत उमटू लागले नाराजीचे सूर, मुख्यमंत्र्यांना धाडले संदेश

जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षांतर्गत उमटू लागले नाराजीचे सूर, मुख्यमंत्र्यांना धाडले संदेश


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - मंगळवार दि. १७ जून २०२५

वसंतदादा पाटील यांची नातसून आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील या येत्या बुधवारी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र त्यांच्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या अंतर्गत गटांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी "जयश्री पाटील यांना पक्षात सामावून घेऊ नये," असा खास निरोप पाठवण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे. हा निरोप नेमका कोणी पाठवला याबाबत सांगली जिल्ह्यात विविध चर्चा व कयास सुरू आहेत.

दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून विविध स्थानिक व वजनदार नेत्यांना पक्षात जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जयश्री पाटील यांच्याबाबतही भाजप व अजित पवार यांच्या स्तरावरून हालचाली सुरू होत्या. अखेर सोमवारी त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय जाहीर केला.


पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात या प्रवेशाबाबत मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आले असले तरी भाजपमध्ये काही निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. जयश्री पाटील यांच्यावर बँक घोटाळ्याशी संबंधित आरोप असल्यानेच त्या पक्षप्रवेश करत असल्याचे म्हटले जात आहे. "स्वतःसह मुलांनाही वाचवण्यासाठीच हा राजकीय पवित्रा घेतला जात आहे," असा संदेश सांगलीकडून थेट मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचवण्यात आला आहे, अशी माहिती पुढे आली आहे.

याप्रकरणी आता देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षशिस्त आणि कार्यकर्त्यांचा विश्वास यामधील समतोल कसा साधला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.