| सांगली समाचार वृत्त |
सांगली - मंगळवार दि. १७ जून २०२५
ज्येष्ठ व अभ्यासू खासदार विशाल पाटील यांना भारतीय जनता पक्षात सहभागी होण्यासाठी अद्यापही संधी खुली आहे. भाजपमध्ये प्रवेश न केल्यास, २०२९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पर्यायी उमेदवार तयार करण्याचा इशारा राज्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिला.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, “आज सकाळी एका कार्यक्रमात माझी आणि खासदार विशाल पाटील यांची अचानक भेट झाली. त्यांनी मला विचारले, ‘कोठे चालला आहात?’ मी उत्तर दिलं, ‘तुमच्याच घरी...’. त्यावर त्यांनी ‘बरं, जावा जावा’ असं उत्तर दिलं. जेव्हा मी विचारलं की, ‘तुझ्या खऱ्या घरी कधी यायचं?’ तेव्हा ते फक्त हसले.”
विशाल पाटील यांना भाजपमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण यापूर्वी दिलेले होते आणि ते आजही कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. "राजकारणात लवचिकतेची आवश्यकता असते. ती नसल्यास मर्यादा येतात. विशाल पाटील हे तरुण, सक्रिय आणि जाणकार खासदार आहेत. भाजपमध्ये आल्यास त्यांना मोठे व्यासपीठ आणि संधी उपलब्ध होईल," असेही त्यांनी नमूद केले.
तथापि, त्यांनी विशाल पाटील यांच्या राजकीय शैलीवर सूचक टीका करताना सांगितले की, "त्यांचा थोडासा उतावळेपणा आणि आततायीपणा मला रुचत नाही. राजकारणातील परिपक्वता वाढवण्याची गरज आहे, आणि ही जाणीव त्यांनाही आहे, हे त्यांचं सकारात्मक वैशिष्ट्य आहे."
यावेळी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाबाबतही आशावाद व्यक्त केला. "विशाल पाटील व प्रतीक पाटील यांच्या भाजप प्रवेशाची आम्ही वाट पाहत आहोत. मात्र त्यांनी प्रवेश न केल्यास २०२९ साठी नव्या चेहऱ्याचा विचार करण्यात येईल," अशी स्पष्ट भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली.